किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी बीअरवर बीअर पिता? पाहा 'हा' उपाय खरंच फायदेशीर असतो की फक्त एक गैरसमज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:45 IST2026-05-14T10:42:58+5:302026-05-14T10:45:58+5:30
Why Beer Can Increase Kidney Stone Risk: किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी बीअर प्या, असा एक सल्ला अनेकदा ऐकायला मिळतो. पण खरंच हा उपाय फायदेशीर असतो की हा केवळ गैरसमज आहे? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट...

किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी बीअरवर बीअर पिता? पाहा 'हा' उपाय खरंच फायदेशीर असतो की फक्त एक गैरसमज
Why Beer Can Increase Kidney Stone Risk: किडनी स्टोनची समस्या उन्हाळ्यात होण्याचा धोका अधिक असतो. कारण या दिवसात बरेच लोक नकळत कमी पाणी पितात. किडनी स्टोन झाल्यास यात किती वेदना होतात हे अनेकांना माहीत असेलच. किडनी स्टोन बाहेर काढण्याचे लोक वेगवेगळे घरगुती उपाय करतात. सोशल मीडियावर सुद्धा यावरील उपायांचे वेगवेगळे दावे केले जातात. यातीलच एक दावा म्हणजे बीअर प्यायल्याने किडनी स्टोन लवकर बाहेर पडतो. बरेच लोक मित्रांचे किंवा नातेवाईकांचे अनुभव ऐकून ही बाब खरी मानतात. पण एक्सपर्ट सांगतात की, हा एक मोठा गैरसमज आहे आणि यावर विश्वास ठेवणं नुकसानकारक ठरतं.
फायद्यांऐवजी नुकसान
अनेक हेल्थ एक्सपर्ट स्पष्टपणे सांगतात की, बीअरने किडनी स्टोनचा धोका अजिबात कमी होत नाही. उलट बीअरने शरीरात डिहायड्रेशन वाढू शकतं, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. लोकांना असं वाटतं की, बीअर एक लिक्विड आहे, त्यामुळे शरीर हायड्रेट राहणार. पण मुळात अल्कोहोलचा प्रभाव उलटा होतो. अल्कोहोल शरीरात डाययूरेटिकसारखं काम करतं, म्हणजे अल्कोहोल प्यायल्यावर पुन्हा पुन्हा लघवी लागते आणि अशात शरीरातील जास्त पाणी बाहेर पडतं. अशात जर कुणी पुरेसं पाणी पित नसेल तर आणि केवळ बीअर पित असेल तर शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते.
वजन वाढतं आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका
डॉक्टर सांगतात की, डिहायड्रेशनमुळे लघवीतील मिनरल्स एकत्र येऊन स्टोन बनवण्याचा धोका अधिक असतो. याचा अर्थ असा की, ज्याला आपण उपाय समजतो तोच अनेकदा समस्या वाढू शकतो. इतकंच नाही तर एक्सपर्टनुसार, बीअरने डिहायड्रेशन तर वाढतंच, सोबतच शरीरात यूरिक अॅसिडचं प्रमाण देखील वाढतं. हाय यूरिक अॅसिड स्टोन तयार होण्याचं एक मोठं कारण ठरू शकतं. सोबतच जास्त प्रमाणात बीअर प्यायल्याने वजन वाढतं आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोकाही वाढतो. ज्या लोकांना वाटतं की, बीअर प्यायल्याने किडनी स्टोन बाहेर पडेल, त्यांची तब्येत अल्कोहोलमुळे आणखी बिघडू शकते.
किडनी स्टोनवर सगळ्यात सोपा उपाय
एक्सपर्ट सांगतात की, किडनी स्टोनपासून बचाव करण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. दिवसभरातून ८ ते १२ ग्लास पाणी प्यायला हवं. जेणेकरून लघवी घट्ट होणार नाही आणि मिनरल्स जमा होणार नाहीत. किडनी स्टोन टाळायचा असेल तर लिंबू सरबतही फायदेशीर ठरतं. कारण यातील सायट्रेट स्टोन तयार होण्यास रोखतं.
अनेकांना हेही माहीत नाही की, किडनी स्टोन केवळ एका कारणाने होत नाही. खाण्या-पिण्याच्या सवयी, पाणी कमी पिणे, जास्त मीठ, मेटाबॉलिक समस्या आणि जेनेटिक कारणही यामागे असतं. त्यामुळे सोशल मिडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवण्यासाठी योग्य ती मेडिकल मदत घेणं अधिक फायदेशीर ठरेल.