ब्लड कॅन्सर असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण, आली नवी उपचार पद्धती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 02:10 PM2022-05-22T14:10:06+5:302022-05-22T16:59:30+5:30

ब्लड कॅन्सर वरील उपचाराच्या अनुषंगानं एक नवी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. एखाद्या योग्य आणि जुळणाऱ्या डोनर अर्थात दात्याकडून मिळालेल्या हेल्दी ब्लड स्टेम सेल्समुळे (Blood Stem Cells) ब्लड कॅन्सर झालेल्या रुग्णाचे प्राण वाचू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

blood cancer solution stem sells can save life expert says | ब्लड कॅन्सर असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण, आली नवी उपचार पद्धती...

ब्लड कॅन्सर असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण, आली नवी उपचार पद्धती...

googlenewsNext

कॅन्सर अर्थात कर्करोग (Cancer) हा गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकार प्रामुख्याने महिलांमध्ये तर काही प्रकार महिला आणि पुरुष अशा दोघांमध्ये दिसून येतात. वेळेत निदान, वैद्यकिय सल्ला आणि उपचार यामुळे कॅन्सर नियंत्रणात येऊ शकतो. देशात दर पाच मिनिटाला एका व्यक्तीला ब्लड कॅन्सर, थॅलेसिमिया किंवा अप्लास्टिक अ‍ॅनेमियाचं निदान होत आहे. यात ब्लड कॅन्सरचं (Blood Cancer) प्रमाण तुलनेनं लक्षणीय आहे.

खरंतर, कॅन्सर म्हटलं की संबंधित रुग्णासह नातेवाईक भयभीत होतात. पण प्रगत तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्रातल्या संशोधनामुळे कॅन्सरवर प्रभावी उपचार शक्य झाले आहे. ब्लड कॅन्सरदेखील याला अपवाद नाही. कारण ब्लड कॅन्सर वरील उपचाराच्या अनुषंगानं एक नवी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. एखाद्या योग्य आणि जुळणाऱ्या डोनर अर्थात दात्याकडून मिळालेल्या हेल्दी ब्लड स्टेम सेल्समुळे (Blood Stem Cells) ब्लड कॅन्सर झालेल्या रुग्णाचे प्राण वाचू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 'टीव्ही 9 हिंदी' नं याविषयीचं वृत्त दिलं आहे.


मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे बालरोग, हिमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन तज्ज्ञ डॉ. शंतनू सेन यांनी ब्लड कॅन्सरवरील नव्या उपचारपद्धती (Treatment) विषयी माहिती दिली आहे. 'ब्लड सेल अर्थात रक्त पेशी ट्रान्सप्लांट या उपचार पद्धतीत डॉक्टर बोन मॅरो (Bone Marrow) म्हणजेच अस्थिमज्जा बाहेर काढतात आणि डोनरकडून मिळालेल्या थेरपी मॅरोनं (Therapy Marrow) बदलतात. ज्या रुग्णाला ल्युकेमिया (Leukemia) म्हणजेच ब्लड कॅन्सर जसे की लिम्फोमा किंवा मायलोमा ( प्लाझ्मा पेशी नावाच्या पांढऱ्या रक्त पेशींमध्ये होणारा कॅन्सर) आहे, अशा रुग्णांसाठी ही उपचार पद्धती उपयुक्त ठरू शकते,' असं डॉ. सेन यांनी सांगितलं.

डॉ. सेन म्हणाले, 'आपण रुग्णाला केमोथेरपीचे (Chemotherapy) मोठे डोस देऊन दोष असलेले मॅरो बाहेर काढतो आणि डोनरकडून मिळालेल्या थेरपी मॅरोनं ते बदलतो. ही प्रक्रिया सिकल सेल (Sickle Cell) आणि थॅलेसिमिया (Thalassemia) हे आजार असलेल्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. या आजारात बोन मॅरो पेशींच्या कमतरतेमुळे रक्ताची निर्मिती करू शकत नाहीत. त्यामुळे केमोथेरपीच्या माध्यमातून दोष असलेले मॅरो हटवले जातात आणि ते एका हेल्दी डोनरच्या (Donar) थेरपी मॅरोनं बदलले जातात. पूर्वी एखाद्या व्यक्तीला ब्लड कॅन्सर झाला म्हणजे त्याचा मृत्यू अटळ आहे, असं समजलं जायचं. ही उपचार पद्धती येण्यापूर्वी या कॅन्सरवर कोणताही उपाय नव्हता. आजही थॅलेसिमियाच्या आजारात ट्रान्सप्लांट करणं शक्य नसेल तर रुग्णाला ब्लड ट्रान्सफ्यूजन करणं कायम ठेवावं लागतं,' असं डॉ. सेन यांनी सांगितलं.

'स्टेम सेल डोनरविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. परंतु, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसाठी करता येणारी ही सर्वात महत्त्वाची आणि चांगली मदत आहे. डोनरचा विचार केला तर ही प्रक्रिया रक्त देण्यासारखीच असते. डोनरला प्रक्रियेनंतर त्याच दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो. या प्रक्रियेमुळे कोणतीही समस्या निर्माण होत नाही. मात्र यासाठी डोनरला काही औषधं घ्यावी लागतात. आजकाल जर डोनरच्या कुटुंबातील सदस्य डोनरसोबत नसेल तर मॅरो घेतले जात नाहीत. या पेशी नसांमधून घेतल्या जातात. यासाठी हाडांपर्यंत जाण्याची गरज नसते. ही प्रक्रिया वेदनारहित (Painless) असते,`` असं डॉ, सेन यांनी स्पष्ट केलं.

'डोनरचा मॅरो रुग्णाच्या भाऊ किंवा बहिणीच्या मॅरोशी जुळणारा असेल तर, ट्रान्सप्लांट यशस्वी होण्याचं प्रमाण 90 टक्के असतं.  डोनर कुटुंबातील व्यक्ती नसेल, कोणी ऐच्छिक दाता असेल यशस्वी होण्याचं प्रमाण सुमारे 85 टक्के असते. पेशी किती वेगानं जोडल्या जातात, यावर ट्रान्सप्लांटच्या यशाचं प्रमाण अवलंबून असतं. सर्वसामान्यपणे यासाठी 14 ते 21 दिवसांचा कालावधी लागतो. जर थॅलेसिमियाच्या रुग्णावर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया केली तर त्या रुग्णाला सामान्य जीवन जगण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागतो. परंतु, त्यानंतर असा रुग्ण कायमस्वरूपी बरा होतो,' असे डॉ. सेन यांनी सांगितले.

वयाचा अडथळा नाही
'बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. अगदी चार महिन्याच्या बाळाचं देखील बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं जातं. या प्रक्रियेत वयाची कोणतीही आडकाठी नसते. पूर्वी वय 60 वर्षापेक्षा अधिक वय नसलेल्या रुग्णावरच ही प्रक्रिया केली जात असे.  प्रगत तंत्रज्ञानामुळे आता अगदी 70 -80 वर्षाच्या रुग्णाचंही बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं शक्य झालं आहे. मात्र यासाठी चांगलं आरोग्य ही एकमेव अट आहे. या उपचार पद्धतीत जोखीम देखील आहे. ट्रान्सप्लांटच्या प्रक्रियेदरम्यान रुग्णाला गंभीर संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत स्वच्छ वातावरणात केली जाते,' अशी माहिती सेन यांनी दिली आहे.

डिकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पॉल या विषयावर बोलताना म्हणाले की, 'ब्लड कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. परंतु, एखाद्या डोनरचा हेल्दी ब्लड स्टेम सेल्स सेट अशा रुग्णासाठी जीव वाचवणारा ठरतो. अनेक लोक या आजाराने ग्रस्त असूनही, एकूण लोकसंख्येपैकी केवळ 0.04 टक्के लोक संभाव्य ब्लड स्टेम सेल डोनर म्हणून नोंदणीकृत आहेत. केवळ 30 टक्के रुग्ण ज्यांना जीवनरक्षक उपचार म्हणून स्टेम सेल ट्रान्सप्लांटची आवश्यकता आहे, त्यांना भाऊ किंवा बहिणीच्या रुपानं डोनर मिळू शकतो. उर्वरित 70 टक्के रुग्णांना रक्ताचं नातं (Blood Relation) नसणाऱ्या तसंच मॅरो जुळणाऱ्या डोनरचा शोध घ्यावा लागतो.'

खरंतर, किडनी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये फरक असल्याचं डॉ. सेन यांनी सांगितलं आहे. 'किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांना आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावं लागतं. परंतु, बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण एका वर्षाच्या आत औषधं घेणं बंद करू शकतात आणि सामान्य जीवन जगू शकतात. अशा रुग्णांना वारंवार डॉक्टरांकडे जाण्याची गरज राहत नाही. परंतु, ब्लड कॅन्सरमध्ये ही प्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण जास्त असलं तरी काही रुग्णांना पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. साधारणपणे ट्रान्सप्लांटनंतर तीन ते चार वर्षात ब्लड कॅन्सर होऊ शकतो. परंतु, रुग्ण पूर्णपणे बरा जरा झाला तर दुसरी कोणतीही चिंता राहत नाही.

या रुग्णांना दोन वर्षांपर्यंत नियमित तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर सर्वसामान्यपणे रुग्णाला दोन ते तीन वर्षांपर्यंत वर्षातून एकदा फिजिशियनची भेट घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र त्यानंतर रुग्णाला डॉक्टरांना दाखवण्याची गरज राहत नाही,' असं डॉ. सेन यांनी सांगितलं.

Web Title: blood cancer solution stem sells can save life expert says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.