सावधान...! एक सिगारेट पुरुषाचे आयुष्य १७ मिनिटांनी कमी करते तर महिलांचे...; ब्रिटिश विद्यापीठाच्या पाहणीतील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:42 IST2024-12-31T06:41:33+5:302024-12-31T06:42:28+5:30
मी तुमचे आयुष्य कमी करते...! सिगरेटचे व्यसन जितक्या लवकर सुटेल तेवढे त्या व्यक्तीसाठी चांगले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिगारेटचे व्यसन सोडले तर २० फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झालेली दिसून येईल.

सावधान...! एक सिगारेट पुरुषाचे आयुष्य १७ मिनिटांनी कमी करते तर महिलांचे...; ब्रिटिश विद्यापीठाच्या पाहणीतील निष्कर्ष
लंडन : एक सिगारेट ओढल्यामुळे पुरुषाचे आयुष्य १७ मिनिटांनी व महिलेचे आयुष्य २२ मिनिटांनी कमी होते, असा निष्कर्ष युनिर्व्हसिटी कॉलेज लंडन (यूसीएल) विद्यापीठाने एका पाहणीतून काढला आहे. ब्रिटनच्या आरोग्य खात्याच्या वतीने यूएलसीने ही पाहणी केली.
एका सिगारेटमुळे माणसाचे आयुष्य ११ मिनिटांनी कमी होते, असा पूर्वी समज होता. अनेक वर्षे सिगारेटचे व्यसन आहे ते आपले आयुष्य १० वर्षे कमी करून घेतात, असे संशोधक डॉ. सारा जॅक्सन यांनी सांगितले.
एकच सिगारेट ओढली तर?
- सिगरेटचे व्यसन जितक्या लवकर सुटेल तेवढे त्या व्यक्तीसाठी चांगले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिगारेटचे व्यसन सोडले तर २० फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झालेली दिसून येईल.
- सिगारेटमुळे आयुष्य ५० दिवसांनी कमी होण्याचा धोका वर्षअखेरीस टळू शकेल. दररोज २० सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा एकच सिगारेट ओढणाऱ्यांना पक्षाघात होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.
दरवर्षी ८० लाख मृत्यू
तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे जगात दरवर्षी
८० लाख लोक मरण पावतात. त्यामध्ये सिगारेट न ओढणारे पण इतर व्यसनांमुळे जीव गमवावा लागलेल्या १३ लाख लोकांचाही समावेश आहे. त्यातील ८० टक्के लोक मध्यम वा अत्यल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात.