आवळ्याच्या बियांचे इतके फायदे की रोजच खाल आवळे अन् उपयोग कराल बियांचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:19 IST2022-01-10T18:16:44+5:302022-01-10T18:19:24+5:30
आवळ्याच्या बियांची पावडर पाण्यातून पोटात घेतल्याने बरेचसे आजार दूर होतात. पाहूया आवळ्याच्या बियांमधील औषधी गुणधर्म.

आवळ्याच्या बियांचे इतके फायदे की रोजच खाल आवळे अन् उपयोग कराल बियांचा
हिवाळ्यात आवळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी समजले जाते. चवीला तुरट, गोड असणारा आवळा रोगप्रतिकारक्षमता वाढवतोच शिवाय त्वचा आणि केस, पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींवरही उपयुक्त आहे.
मात्र आपल्याला माहित आहे का की, आवळ्याच्या बियांमध्येसुद्धा भरपूर औषधी गुणधर्म आहेत. बऱ्याचदा आवळा खाल्ल्यानंतर आपण बिया टाकून देतो. त्याऐवजी या बिया उन्हात वाळवून त्याची पावडर करून वापरता येतात. आवळ्याच्या बियांपासून तयार केलेल्या पावडरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या बियांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी, कॅरोटिन, आयर्न आणि फायबर ही पोषक तत्त्वे आहेत. त्यामुळे आवळ्याच्या बियांची पावडर पाण्यातून पोटात घेतल्याने बरेचसे आजार दूर होतात. पाहूया आवळ्याच्या बियांमधील औषधी गुणधर्म.
खरुज, त्वचेवरील डाग, त्वचेला खाज येण्याची समस्या बऱ्याच दिवसांपासून असेल तर तुम्ही आवळ्याच्या बियांचा वापर करू शकता. या त्रासांवर या बिया अत्यंत गुणकारी आहेत. या बियांची पावडर वापरल्याने त्वचाविकार दूर होतात. याकरिता खोबरेल तेलात सुकलेली आवळ्याची बी वाटून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचाविकार असलेल्या जागी लावल्यास आराम मिळतो.
दीर्घकालीन बद्धकोष्ठतेने त्रस्त असलेल्यांकरिताही या बिया अत्यंत फायदेशीर आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी आवळ्याची बी वाटून त्याची पावडर बनवा. ही पावडर गरम पाण्यात घालून ते पाणी प्या. या बद्धकोष्ठता दूर होईल.
डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे, डोळे लाल होणे, अशी तक्रार असल्यास आवळ्याच्या बिया वाटून डोळ्यांच्या वर व खाली लावल्यास फायदा होतो.
अचानक उचकी लागली आणि बराच वेळ झाला तरी थांबत नसेल तर आवळ्याच्या बियांपासून तयार केलेली पावडर मधासोबत घ्या. या उपायामुळे काही मिनिटांतच उचकीची समस्या दूर होईल.
नाकाचा घोणा फुटल्याने नाकातून रक्त येते. अतिउष्णतेमुळे हा त्रास होतो. यावेळी आवळ्याची बी पाण्यात वाटावी. वाटलेली पेस्ट कपाळावर लावून झोपावे. यामुळे शरीराला थंडावा मिळून नाकातून रक्त येण्याच्या त्रासापासून आराम मिळतो.
आवळ्याच्या बिया वीर्यवर्धक आहेत. आवळ्याच्या 10 ग्रॅम बिया उन्हात वाळवाव्यात आणि वाटून त्याचे चूर्ण तयार करा. या चुर्णात 20 ग्रॅम पिठी साखर मिसळा. हे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास पाण्यातून 1 चमचा असे 15 दिवस घेतल्याने निद्रानाश दूर होतो. तसेच शुक्राणूजन्य आजार दूर व्हायला मदत होते.