सतत तहान लागत राहणे नाही सामान्य, असू शकतं अनेक गंभीर आजारांचं लक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 17:50 IST2022-09-11T17:46:28+5:302022-09-11T17:50:01+5:30
दिवसभरात दर तीन ते चार तासांनी पाणी पिणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे; पण दर अर्ध्या किंवा एक तासानंतर तहान लागत असेल आणि पाणी पिण्याची इच्छा होत असेल तर ही बाब चिंताजनक ठरू शकते. कारण प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणं (Excessive Thirst) हे एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

सतत तहान लागत राहणे नाही सामान्य, असू शकतं अनेक गंभीर आजारांचं लक्षण
जीवनशैलीत बदल झाल्याने हृदयविकार (Heart Disease), डायबेटीससारखे (Diabetes) गंभीर आजार जडण्याचं प्रमाण वाढलं आहे. आजार (Disease) कोणताही असला तरी त्याची पूर्वलक्षणं (Symptoms) शरीरात दिसू लागतात. त्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं आणि वैद्यकीय सल्ला घेतला, तर आजार नियंत्रणात राहतात.
दिवसभरात दर तीन ते चार तासांनी पाणी पिणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे; पण दर अर्ध्या किंवा एक तासानंतर तहान लागत असेल आणि पाणी पिण्याची इच्छा होत असेल तर ही बाब चिंताजनक ठरू शकते. कारण प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणं (Excessive Thirst) हे एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. अशा वेळी संबंधित व्यक्तीने याकडे दुर्लक्ष न करता तातडीनं वैद्यकीय तपासणी, उपचार सुरू करणं गरजेचं आहे. डायबेटीस, डिहायड्रेशन, अॅनिमिया यांसारख्या आजारांमध्ये सर्वसामान्यपणे हे लक्षण दिसतं. त्यामुळे निदान करून घेणं गरजेचं आहे. `एनडीटीव्ही`नं याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
डायबेटीस, ड्राय माउथ, अॅनेमिया यांसारख्या आजारांची काही पूर्वलक्षणं शरीरात दिसतात. त्यामध्ये तहान लागणं, सातत्यानं पाणी पिण्याची इच्छा होणं या लक्षणाचा समावेश असतो. शरीरातल्या लाल पेशींची संख्या कमी झाली तर अॅनिमिया (Anemia) नावाचा आजार होतो. सामान्य भाषेत याला रक्ताची कमतरता असं म्हणतात. अॅनिमिया झाल्यास लगेच प्रमाणापेक्षा जास्त तहान लागत नाही; पण आजार गंभीर बनला तर हळूहळू तहान लागण्याचं प्रमाण वाढू शकतं.
डायबेटीस हेदेखील सतत तहान लागण्याचं कारण असू शकतं. डायबेटीसमुळे प्रमाणापेक्षा जास्त तहान लागते. डायबेटीसचे असे दोन ते तीन प्रकार आहेत, ज्यामध्ये शरीर फ्लुइड्सचं (Fluids) योग्य पद्धतीनं नियमन करू शकत नाही. अशा स्थितीत शरीरातलं पाणी कमी होतं. अशा स्थितीत तपासणी केली असता डायबेटीसचं निदान होतं.
डिहायड्रेशनकडे आजार म्हणून नाही तर आरोग्यविषयीची एक समस्या म्हणून पाहिलं जातं. शरीरात पाणी किंवा द्रव पदार्थाची कमतरता निर्माण झाली तर डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन (Dehydration) झाल्यावर चक्कर येणं, उलट्या होणं, डोकेदुखी किंवा जुलाब होणं या समस्या निर्माण होतात.
ड्राय माउथ (Dry Mouth) अर्थात तोंडाला कोरड पडणं ही एक प्रकारची समस्या आहे, ज्यामुळे सारखं पाणी पिण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. तोंडाला कोरड पडणं हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. तोंडातल्या ग्रंथी लाळेची निर्मिती योग्य पद्धतीने करत नसतील तर ही समस्या निर्माण होते. यामुळे तोंडाला दुर्गंधी येणं, हिरड्यांना संसर्ग होणं आणि ओठ दातांना चिकटणं आदी समस्या निर्माण होऊ शकतात.