सावधान! ही सहज दिसणारी लक्षण ठरू शकतात हृदयासाठी घातक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:46 IST2021-05-20T18:33:01+5:302021-05-20T18:46:26+5:30
आपल्याला असे वाटते छातीत दुखणे म्हणजे हृदयरोगाचे पहिले लक्षण आहे पण, आपले शरीर या आधीच आपल्याला काही सिग्नल्स देते. त्याकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांकडे जाऊन उपचार करुन घेणं फायदेशीर आहे.

सावधान! ही सहज दिसणारी लक्षण ठरू शकतात हृदयासाठी घातक...
हृदयरोगाची अशी अनेक लक्षणं आहेत जी आपल्याला लगेच कळत नाहीत पण ती फार धोकादायक ठरु शकतात. आपल्याला असे वाटते छातीत दुखणे म्हणजे हृदयरोगाचे पहिले लक्षण आहे पण, आपले शरीर या आधीच आपल्याला काही सिग्नल्स देते. त्याकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांकडे जाऊन उपचार करुन घेणं फायदेशीर आहे. जर खाली दिलेल्या लक्षणांपैकी काही लक्षणे आपल्याला जाणवली तर डॉक्टरांकडे लगेच धाव घ्या. कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिषेक शुक्ला यांनी या लक्षणांबातची माहिती. ओन्ली माय हेल्थ शी बोलताना दिली.
व्यायाम किंवा मॉर्निंगवॉक करताना छातीत दुखणं
व्यायाम किंवा वॉक करताना आपल्याला दमायला होतं. श्वासोच्छवासाचा वेग वाढतो. तुम्हाला वाटत असेल की हे व्यायाम केल्यामुळे होत आहे, पण हा तुमचा गैरसमज ठरू शकतो. समजा धावताना किंवा व्यायाम करताना तुमच्या छातीत दुखू लागले आणि तुम्हाला थकल्यासारखे वाटू लागले तर निश्चितच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे दुखणं जर बराचवेळ तसंच राहिलं तर डॉक्टरचा योग्य सल्ला घ्या.
हार्ट पल्पटेशन
तुम्हाला हार्ट पल्पटेशनची समस्या जाणवत असेल तर वेळ न दवडता डॉक्टरकडे जा. हार्ट पल्पटेशन म्हणजे अचानक तुमचे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच हे कधीही मध्येच जाणवते. असं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य.
घशाचे किंवा जबड्याचे दुखणे
घशाचे किंवा जबड्याच्या दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. जर तुम्हाला छातीच्या दुखण्याबरोबरच जबडा आणि घशाचेही दुखणे असेल तर हे हृदयविकाराचे एक लक्षण असू शकते. श्वासोच्छवास वाढणे, अनियमत हृदयाचे ठोके वाढणे तसेच घशाचे आणि जबड्याचे दुखणे ही हृदयविकाराची काही सामान्य लक्षणे आहेत.
श्वास घेताना त्रास होणे
तुम्हाला रोजचा दिनक्रम पार पाडताना त्रास होत असेल तर वेळीच लक्ष द्या. पायऱ्या चढताना त्रास होत असेल, श्वास घेताना त्रास होत असेल तर हे वजन वाढल्यामुळे आहे असे अजिबात समजू नका. हे हृदयरोगाचे लक्षण असू शकते.
सूज
समजा तुम्हाला पाय किंवा शरीरातील इतरही कोणत्या भागात सुज असेल तर वेळीच सावधान व्हा! बरेचदा हृदयविकार असणाऱ्या रुग्णांमध्ये पायावर किंवा शरीरातील अन्य भागांवर सुज येते. त्यामुळे त्वरित डॉक्टरकडे जा.