तोंडाची चांगली स्वच्छता न करणं ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण, जाणून कसं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 11:39 IST2019-05-31T11:29:29+5:302019-05-31T11:39:35+5:30
तोंडाची योग्यप्रकारे स्वच्छता न केल्यास जीवावर बेतू शकतं, याची कुणी कल्पनाही केली नसावी.

तोंडाची चांगली स्वच्छता न करणं ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण, जाणून कसं...
(Image Credit : Steemit)
तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे फारच गरजेचं आहे. पण केवळ ब्रश करून काम भागत नाही. जिभेची आणि तोडांचीही चांगली स्वच्छता गरजेची आहे. नुकत्याच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जे लोक ओरल हेल्थ म्हणजेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेत नाहीत, त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो.
काय सांगतो रिसर्च?
जर तुम्ही रोज तोडांची चांगल्याप्रकारे स्वच्छता करत नसाल तर तुम्हाला हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. तोंडात आढळणारे बॅक्टेरिया फार घातक असतात. हे बॅक्टेरिया धमन्यांमध्ये रक्त गोठवतात, ज्यामुळे शरीरातील इतर अवयवांना व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही. हेच बॅक्टेरिया जेव्हा तुमच्या मेंदूच्या धमण्या किंवा हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लड क्लॉटिंग करतात, तेव्हा व्यक्ती ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकची शिकार होते.
रक्त पुरवठा थांबतो
नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तोंडात आढळणारे बॅक्टेरिया धमण्यांमध्ये रक्त गोठवतात, ज्यामुळे व्यक्तीचा स्ट्रोकचा धोका असतो. फिनलॅन्डच्या टेम्पिअर यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या शोधासाठी स्ट्रोकवर उपचार घेणाऱ्या ७५ रूग्णांवर अभ्यास केला. त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली.
रक्ताच्या टेस्टमधून आलं हे समोर...
रूग्णांमध्ये ब्लड क्लॉट्स(गोठलेलं रक्त) ची तपासणी केल्यावर असं आढळलं की, या रक्तांच्या गाठींमध्ये ७९ टक्के असा डीएनए आढळला, जे तोंडातील बॅक्टेरियापासून तयार केले जातात. तर याच रूग्णांच्या शरीराच्या दुसऱ्या भागात आढळणाऱ्या रक्तात हे बॅक्टेरिया फार कमी प्रमाणात आढळले. यामुळे शोधातून हा निष्कर्ष निघतो की, तोंडात तयार होणारे बॅक्टेरिया हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचं कारण ठरू शकतात. हा रिसर्च जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
१० वर्षांपासून सुरू होता रिसर्च
टेम्पिअर यूनिव्हर्सिटीचे अभ्यासक गेल्या १० वर्षांपासून या गोष्टीच्या शोधात होते की, कार्डिओवक्सुलर रोगांमध्ये बॅक्टेरियाची काय भूमिका असते. याबाबत आधीही काही शोध करण्यात आले. त्यातून समोर आलं की, तोंडाची चांगल्याप्रकारे स्वच्छता न करणे आणि तोंडात बॅक्टेकिया वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका असतो. त्यासोबतच हे बॅक्टेरिया डीप वेन थ्रोम्बोसिस( पायांच्या धमण्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणे)चं कारणही ठरू शकतात.