पाठ दुखतेय, लघवीतून रक्त पडतंय; मूत्रपिंडाचा कर्करोग तर नाही? वेळीच गांभीर्य लक्षात घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:18 IST2025-11-08T14:18:22+5:302025-11-08T14:18:54+5:30
शहरी भागांमध्ये हा आजार मध्यम वयोगटातील लोकांमध्ये अधिक आढळतो

पाठ दुखतेय, लघवीतून रक्त पडतंय; मूत्रपिंडाचा कर्करोग तर नाही? वेळीच गांभीर्य लक्षात घ्या
लोकमत न्युज नेटवर्क, मुंबई: स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव या जीवनशैलीतील सवयींमुळे मूत्रपिंडाचा कर्करोग झपाट्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्यतज्ज्ञांच्या मते, २०५० पर्यंत या आजाराचे प्रमाण आणि मृत्यूदर दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. वेळेवर लक्षणे ओळखून उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो, परंतु अनेक रुग्णांना निदान उशिरा होते. मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढताहेत. गेल्या काही वर्षांत भारतात मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये हा आजार मध्यम वयोगटातील लोकांमध्ये अधिक आढळतो.
प्रमुख कारणे कोणती?
अधिक वजन, उच्च रक्तदाब, दीर्घकाळ चालणारा मधुमेह, धूम्रपान, औषधांचा गैरवापर आणि प्रदूषित हवा, पाणी यामुळे धोका वाढतो. लघवीतून रक्त येऊ लागल्यास सावधान. लघवीत रक्त दिसणे हे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे सर्वांत ठळक लक्षण आहे. अनेकदा वेदना नसल्याने रुग्ण दुर्लक्ष करतात.
मूत्रपिंडाचा कर्करोग म्हणजे काय?
मूत्रपिंडातील पेशी अनियंत्रितपणे वाढून गाठ तयार होते, ती पुढे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते, यालाच मूत्रपिंडाचा कर्करोग म्हटले जाते.
इतर लक्षणे कोणती?
पाठ किंवा कंबरेत वेदना, भूक मंदावणे, वजन कमी होणे, अशक्तपणा आणि ताप अशी लक्षणे आढळू शकतात.
देशात सर्व प्रकारचे कॅन्सर कर्करोग जे आहेत त्यात दोन ते पाच टक्के प्रमाण हे मूत्रपिंड कर्करोगाचे आहे आणि हे प्रमाण भारतात दरवर्षी दोन ते चार टक्के वाढत आहे. धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना या कर्करोगाचा धोका अधिक असतो. जीवनशैलीतील बदलांमुळे मूत्रपिंडाचा कर्करोग वाढतो आहे. लघवीतून रक्त येणे हे लक्षण दुर्लक्ष करू नका. जेवणात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवणे, नियमित व्यायाम, तळलेले पदार्थ खाणे टाळा.
श्रीरंग बिच्चू, अधिकारी आणि नेफ्रोलॉजी विभाग प्रमुख, बॉम्बे हॉस्पिटल