जीवनाला दुसरी संधी: हाडांच्या कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हात/पाय वाचवणारी शस्त्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 20:05 IST2025-08-07T20:03:09+5:302025-08-07T20:05:11+5:30

हा आजार केवळ मुलासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारा असतो.

A second chance at life: Limb-saving surgery for children with bone cancer | जीवनाला दुसरी संधी: हाडांच्या कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हात/पाय वाचवणारी शस्त्रक्रिया 

जीवनाला दुसरी संधी: हाडांच्या कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हात/पाय वाचवणारी शस्त्रक्रिया 

-डॉ. राज नगरकर (मॅनेजिंग डायरेक्टर, प्रमुख सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन, HCG मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक)

मुलांमध्ये हाडांचा कॅन्सर दुर्मिळ असतो, परंतु जेव्हा हा आजार होतो, तेव्हा तो अत्यंत आक्रमक आणि झपाट्याने पसरतो. हा प्रकार बहुतेक वेळा वाढत्या वयातील मुलांमध्ये विशेषतः गुडघ्याजवळ किंवा खांद्याजवळ दिसून येतो, जिथे हाडांची वाढ वेगाने होते.

हा आजार केवळ मुलासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारा असतो. उपचार, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन यासारख्या कठीण निर्णयांचा सामना करावा लागतो.

पूर्वीची परिस्थिती

पूर्वी, जर मुलाच्या हातात किंवा पायात हाडांचा कॅन्सर झाला, तर वैद्यकीय उपचार हे खूप कठोर स्वरूपाचे असायचे. कॅन्सरग्रस्त हाडाचा संपूर्ण भाग काढून टाकावा लागे. जर ट्युमर मोठा असेल किंवा शरीरातील अत्यावश्यक रचनेच्या जवळ असेल, तर पाय किंवा हात कापणे (amputation) हाच एकमेव पर्याय होता. प्राधान्य हे फक्त जीवन वाचवणे असायचे जर त्यामुळे हालचाली गमवाव्या लागल्या तरी.

आता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे बदल

आज, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अधिक चांगल्या नियोजनामुळे, अशा प्रकारचे शस्त्रक्रियेचे मार्ग तयार झाले आहेत जे कॅन्सर काढून टाकतात पण लिंब (हात/पाय) जपतात. यामधील एक पद्धत म्हणजे Extracorporeal Irradiation (ECI) हाड वाचवणारी शस्त्रक्रिया जी काही निवडक मुलांमध्ये यशस्वी ठरत आहे.

ही प्रक्रिया कशी असते?

ECI (एक्स्ट्रा कॉर्पोरियल इरॅडिएशन) प्रक्रियेमध्ये ट्युमर असलेला हाडाचा भाग शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला जातो. नंतर हा भाग शरीराबाहेर अत्यंत तीव्र रेडिएशनद्वारे उपचारित केला जातो. ज्यामुळे त्या भागातील सर्व कॅन्सर पेशी नष्ट होतात.

ही प्रक्रिया ऐकायला सरळ वाटते, पण प्रत्येक टप्प्यावर अचूकतेची गरज असते. उद्देश असा की एकही कॅन्सर पेशी उरू नये, पण हाडाच्या संरचनेला इजा होऊ नये.

एकदा हे हाड पूर्ण निर्जंतुक (sterilized) केल्यावर ते पुन्हा शरीरात मूळ जागी बसवले जाते आणि सर्जिकल हार्डवेअरद्वारे सुरक्षितरीत्या फिक्स केले जाते.

कारण मुलाचं स्वतःचं हाड वापरलं जातं, त्यामुळे कृत्रिम प्रत्यारोपणासारख्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे डोनरची गरज राहत नाही, आणि शरीर त्या भागाला नाकारण्याचा धोका कमी होतो.

कोणासाठी योग्य?

ही उपचारपद्धती प्रत्येक मुलासाठी योग्य असेलच असे नाही. ही सर्वात चांगली तेव्हाच कार्यक्षम असते जेव्हा ट्युमर पसरलेला नसतो आणि मूल केमोथेरपीला चांगला प्रतिसाद देत असतो.

कॅन्सरची जागाही महत्त्वाची असते ती अशा ठिकाणी असावी जिथे स्वच्छपणे हाड काढून टाकता येईल आणि आजूबाजूच्या नसा किंवा महत्त्वाच्या रचना सुरक्षित राहतील.

अनुभवी सर्जन्सच्या हाती, ही पद्धत खूप प्रभावी ठरली आहे. अनेक मुलांनी शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांत चांगले पुनरुत्थान (functional recovery) दाखवले आहे आणि दीर्घकालीन तपासणीतही चांगले परिणाम दिसून आले आहेत. विशेषतः कॅन्सर लवकर आढळल्यास आणि वेळीच उपचार झाल्यास.

हे महत्त्वाचे का आहे?

एका मुलासाठी लिंब गमावणे हे फक्त शारीरिकच नव्हे तर भावनिक दृष्टिकोनातूनही आयुष्य बदलवणारे असते.
त्याच्या हालचाली, खेळणे, आत्मविश्वास, आणि इतर लोक त्याच्याकडे कसे पाहतात या सर्व गोष्टी बदलतात.

ECI पद्धतीमुळे, मूल आपला हात/पाय जपू शकते, आणि त्यामुळे अनेक मानसिक आणि सामाजिक अडचणी टाळता येतात. शारीरिक पुनर्वसन अजूनही आवश्यक असते, पण मानसिकदृष्ट्या ही प्रक्रिया हलकी वाटते कारण मूल ‘आपलंच’ काहीतरी टिकवून ठेवू शकतं.

बहुतेक वेळा, मुले प्रौढांपेक्षा लवकर सावरतात. पुनर्वसन सुरू झाल्यानंतर त्यांचे दैनंदिन जीवन फारसे बदल न करता पूर्ववत होते.

पुढे काय?

ECI सारख्या लिंब जपणाऱ्या उपचारपद्धतींमध्ये वाढता रस ही बाल कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांची खूण आहे जिथे केवळ जिवंत राहणं नव्हे, तर चांगलं आयुष्य जगणं हेही उद्दिष्ट ठरत आहे.

आज डॉक्टर केवळ हे पाहत नाहीत की मूल कॅन्सरवर मात करू शकेल का, तर ते कॅन्सरनंतर कसं जीवन जगेल हेही तेवढंच महत्त्वाचं ठरत आहे.

अनेक रुग्णालयं आता ही पद्धत शिकण्यासाठी त्यांच्या सर्जिकल टीमला प्रशिक्षित करत आहेत. जसजशी ही कौशल्ये वाढत आहेत, तसतशी अधिकाधिक कुटुंबांना निदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ECI हा पर्याय दिला जातोय.

ही पद्धत सर्वांसाठी योग्य नाही, पण ज्या निवडक मुलांसाठी ती लागू होते. त्यांच्यासाठी ही केवळ वैद्यकीय प्रगती नाही, तर एक शांत पण सामर्थ्यवान आशेची किरण आहे.

Web Title: A second chance at life: Limb-saving surgery for children with bone cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.