Diabetes Tips: डायबिटीस रुग्णांनो सावधान! तुम्हाला गोड, खारट चव समजत नाहीये का? अभ्यासातून गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:50 IST2022-03-07T16:49:35+5:302022-03-07T16:50:02+5:30
विविध पदार्थांची चव फिकी की गोड, कडू की आंबट हे ओळखणं मधुमेहींना कठीण होतं. चवीचा प्रकार आणि तिची तीव्रता या दोन्ही बाबी त्यांच्या जिभेला समजत नसल्याचं समोर आलंय.

Diabetes Tips: डायबिटीस रुग्णांनो सावधान! तुम्हाला गोड, खारट चव समजत नाहीये का? अभ्यासातून गंभीर इशारा
एका अभ्यासातून ४३ टक्के मधुमेहींना विविध प्रकारच्या चवी आणि स्वाद समजत नसल्याचं समोर आलंय. लाईफस्टाईल सिंड्रोम (Lifestyle syndrome) आणि वृद्धापकाळातील मधुमेह असलेल्या ४३.३० टक्के रुग्णांमध्ये हा स्वाद विकार आढळून आला आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे. यामध्ये जीभेला चव समजत नसल्याचे (tongue does not understand taste) दिसून आले आहे.
विविध पदार्थांची चव फिकी की गोड, कडू की आंबट हे ओळखणं मधुमेहींना कठीण होतं. चवीचा प्रकार आणि तिची तीव्रता या दोन्ही बाबी त्यांच्या जिभेला समजत नसल्याचं समोर आलंय. मधुमेहाचा परिणाम फक्त मूत्रपिंड, हृदय, यकृत आणि डोळ्यांवर होतो हा गैरसमजही या महत्त्वाच्या अभ्यासानं दूर केलाय. या अभ्यासात असं आढळून आले की, मधुमेह असलेल्या जवळपास निम्म्या रुग्णांना गोड चव ओळखता येत नाही. त्यांना खूप गोड असलेला पदार्थ थोडासाच गोड किंवा कमी गोड असलेला पदार्थ खूप गोड असल्यासारखं वाटलं. तसंच, आंबट, खारट आणि कडू चव या चवी ओळखणंही जिभेला शक्य झालं नाही.
या अभ्यासासाठी ६० रुग्णांकडून लेखी संमती घेण्यात आली. एका वर्षासाठी केस स्टडी ग्रुपमध्ये विभागून त्यांचा अभ्यास करण्यात आला. हा प्रकार म्हणजे ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमुळं होणारं केमिकल टेस्ट डिस्फंक्शन असल्याचं डॉक्टर म्हणतात. यामध्येही गोड चव सर्वांत जास्त प्रमाणात ओळखता येत नसल्याचं आढळून आलं आहे.
अभ्यासात समाविष्ट केलेल्या रुग्णांना ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमुळे चव समजत नसल्याचं आढळून आले. आतापर्यंत असं मानलं जात होतं की, मधुमेहाचा परिणाम फक्त मूत्रपिंड, हृदय, डोळे आदींवर होतो. प्रथमच, या अभ्यासानं स्वाद विकाराविषयी (म्हणजेच स्वाद ओळखण्यात गफलत) भाष्य केलंय.
प्रो. जेएस कुशवाह, औषध विभाग, जीएसव्हीएम वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून अभ्यासातील परिणामांची नियंत्रण गटाशी तुलना करण्यात आली. त्यामुळं अचूक परिणाम समोर आले आहेत. अभ्यासाची प्रस्तावना अमेरिकन डायबिटीज जर्नल आणि असोसिएशननं देखील स्वीकारली आहे. हा अभ्यास तिथे प्रकाशनासाठी पाठविण्यात आलाय.