गाडी विकत घ्यायला आईचा नकार.. त्याने रागारागात लहान भावाचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 18:09 IST2021-12-19T18:01:57+5:302021-12-19T18:09:47+5:30
आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील मोठ्या भावाने आईने नवीन गाडी विकत घ्यायला नकार दिल्याच्या रागातून मतिमंद असलेल्या लहान भावाचा गळा आवळून खून केला.

गाडी विकत घ्यायला आईचा नकार.. त्याने रागारागात लहान भावाचा केला खून
गोंदिया : आईने नवीन गाडी विकत घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने लहान मतिमंद भावाची गळा दाबून खून केला. ही घटना आमगाव तालुक्याच्या शिवणी येथे १७ डिसेंबरच्या पहाटे ५ च्या सुमारास घडली.
भुवन लक्ष्मण डोये (१९) रा. शिवणी असे मृताचे नाव आहे. हेमंत लक्ष्मण डोये (२३) रा. शिवणी, असे आरोपी भावाचे नाव आहे. हेमंत हा आपल्या आईला नवीन गाडी घेण्यासाठी पैसे मागत होता. परंतु त्याचा लहान भाऊ भुवन लक्ष्मण डोये हा मतिमंद असल्याने त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे लागतात म्हणून आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता.
मतिमंद भावाच्या उपचाराला पैसे लागत असल्याने मला नवीन गाडी मिळत नाही असा राग हेमंतच्या मनात घर करून होता. त्याच्या उपचारासाठी पैसे खूप लागत असल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत नाही असे गृहित धरून आरोपीने १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सर्व झोपी गेल्यावर लहान भावाचा गळा आवळून खून केला. १७ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता उठल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आईच्या तक्रारीवरून आरोपी मुलावर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नाळे करीत आहेत.