तोंडातून शब्द निघत नाही; निघतात फक्त अश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST2021-09-22T05:00:00+5:302021-09-22T05:00:03+5:30
वाहनचालक प्रताप रहांगडाले हा नेहमीप्रमाणे वाहनाची किल्ली घेण्यासाठी मृत रेवचंद डोंगरु बिसेन (५१) यांच्या दारात आला तेव्हा त्याला या घरातील मृतदेह जागोजागी पडलेले दिसले. त्याने आरडाओरड केल्यावर घराजवळील लोक गोळा झाले. चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रेवचंद डोंगरु बिसेन (५१) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून खून करण्यात आला होता.

तोंडातून शब्द निघत नाही; निघतात फक्त अश्रू
नरेश रहिले
लोकमत न्युज नेटवर्क
गोंदिया : घरात पाच सदस्य परंतु पाचपैकी चौघांची निर्घृण हत्या झाली. त्याच घरात एका खोलीत बंद दाराच्या आत पक्षाघाताच्या आजाराने खाटेवर पडून असलेल्या ९० वर्षांच्या केमनबाई डोंगरू बिसेन यांना या घटनेची माहिती झालीच नाही. घटनेमुळे घरात आरडाओरड झाली असेल तर तेसुद्धा त्या वृद्धेला सांगताच येत नाही. मागील अनेक वर्षांपासून आजारी असलेल्या केमनबाई बिसेन यांना स्वबळावर उठता येत नाही शिवाय बोलताही येत नाही.
ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा, सून व ज्या नातवंडांना हातावर खेळविले त्यांनाही क्षणार्धात काळाने घाला घातला. पहाटेपासून मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना केमनबाई नेहमीसारख्याच आपल्या खाटेवर झोपूनच होत्या.
वाहनचालक प्रताप रहांगडाले हा नेहमीप्रमाणे वाहनाची किल्ली घेण्यासाठी मृत रेवचंद डोंगरु बिसेन (५१) यांच्या दारात आला तेव्हा त्याला या घरातील मृतदेह जागोजागी पडलेले दिसले. त्याने आरडाओरड केल्यावर घराजवळील लोक गोळा झाले. चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रेवचंद डोंगरु बिसेन (५१) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून खून करण्यात आला होता. घरभर रक्ताचा सडा पडलेला होता.
लोकांनी गर्दी केल्यावर केमनबाई घरात जीवंत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षाघातामुळे त्यांना उठता येत नाही व बोलताही येत नाही. घटनेमुळे फक्त ९० वर्षांची आजी अश्रू ढाळत आहेत.
तीन गोष्टींमुळे रेवचंद यांचीही हत्याच
- रेवचंद बिसेन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. आरोपींनी या घटनेला चुकीच्या पद्धतीने वळविण्यासाठी जणू रेवचंदनेच खून करून आत्महत्या केल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी शेवटी काही पुरावे सोडलेच. रेवचंद यांचा मृतदेह लटकविण्यात आला त्या दोराला घरातून खिडकीपर्यंत नेऊन बांधण्यात आले. तिघांचा ज्या पेंडलने मारून खून करण्यात आला तो पेंडल घटनास्थळपासून १५ फूट अंतरावर वऱ्हांड्यात आढळला. रेवचंद यांनी हे कृत्य केले असते तर ९० वर्षांच्या म्हाताऱ्या आईला एकाकी सोडून हे कृत्य केले नसते. तिला भावांकडे सोडून दिले असते. गावातच चार भावंडे असताना त्यांच्याकडे तिला सोपविले असते. परंतु रेवचंदच्या घरात वाद नाही काहीच नाही अशातच रात्री जेवणकरून शांततेने झोपी गेलेले बिसेन कुटुंबीय सकाळचा दिवस पाहूच शकले नाही. या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोलीस कधी पोहचतील याची उत्सुकता लोकांना लागली आहे.