तस्करांशी सामना करतात शस्त्रांविनाच
By Admin | Updated: August 14, 2015 02:02 IST2015-08-14T02:02:05+5:302015-08-14T02:02:05+5:30
जिल्ह्यात वन विभाग गोंदिया अंतर्गत एकूण २५२६ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. यापैकी काही क्षेत्र नक्षल प्रभावित आहेत.

तस्करांशी सामना करतात शस्त्रांविनाच
पिस्तुल व रायफल नाही : वन विभागाची शस्त्रे पोलीस शस्त्रागारात
लोकमत विशेष
देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्यात वन विभाग गोंदिया अंतर्गत एकूण २५२६ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. यापैकी काही क्षेत्र नक्षल प्रभावित आहेत. वनरक्षकांना शस्त्र जवळ बाळगण्याची परवानगी असूनही स्वत:च्या व शस्त्रांच्या रक्षणासाठी ते शस्त्रे वनात नेत नाही. त्यामुळे वन विभागाची सर्व शस्त्रे पोलीस मुख्यालयात असलेल्या जिल्हास्तरीय शस्त्रागारात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वनांचे संरक्षण शस्त्रांशिवाय होत आहे.
जिल्ह्यात वन विभाग व वन्यजीव विभागांतर्गत मोडणाऱ्या क्षेत्रात वनांच्या संरक्षणासाठी वनरक्षकांची पदे कार्यरत आहेत. वनरक्षकांना कमीत कमी वर्षातून एकदा शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या वेळीच सदर शस्त्रे काढली जातात. वन विभागाचे स्वत:चे शस्त्रे असून ते पोलीस विभागाच्या शस्त्रागारात आहेत. वन विभागाकडे त्या शस्त्रांची देखभाल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ किंवा संत्री नाही. त्यामुळेच वन विभागाची शस्त्रे पोलीस विभागाच्या शस्त्रागारात ठेवण्यात आली असून त्यात पिस्तूल व रायफल यांचा समावेश आहे. तेथे सर्व शस्त्रांची देखभाल केली जाते.
पोलीस समुहाने फिरतो किंवा समुहात राहून कारवाई केली जाते. मात्र वनरक्षक वनात एकटा-दुकटाच फिरत असतो. एकटा व्यक्ती शस्त्र सांभाळू शकत नाही. शिवाय नक्षलवाद्यांकडून ते शस्त्र बळकावण्याचीच भीती अधिक असते. त्यामुळे वनरक्षकांना परवानगी असूनही स्वत:च्या व शस्त्रांच्या रक्षणासाठी ते वनात शस्त्रे नेत नाही, असे वन विभागातून सांगण्यात आले आहे. मात्र वनरक्षकावर एखाद्या हिंस्त्र पशूने हल्ला केला किंवा तो नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडला तर त्याने काय करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
वनरक्षक जरी वनात शस्त्रे घेवून जात नसले तरी मात्र एखादी कारवाई करावयाची असल्यास शस्त्र घेवून जाता येते. त्यासाठी पोलीस विभागाला आधी माहिती देवून पोलिसांच्या सहकार्यानेच वनरक्षक कारवाई करू शकतात. त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. शिवाय आत्मसंरक्षणासाठी शस्त्रांचा वापर केला जावू शकतो, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. मात्र शस्त्राविना वनात असणाऱ्या वनरक्षकांना दहशतीत जीवन जगावे लागत असणार, ही बाब नाकारली जावू शकत नाही. (प्रतिनिधी)
गोंदिया वन विभागातील वनांची विभागणी
जिल्ह्यात जुणे आरक्षित वन २८१.६१७४ चौकिमी, नवीन आरक्षित वन ४४६.४०८४ चौकिमी, संरक्षित वने ६८२.७४९८ चौकिमी, गोसे संरक्षित वने २९.९५६१ चौकिमी, झुडपी जंगले २१९.७०२० चौकिमी, अवर्गीकृत वन ७२.४०५९ चौकिमी व कंपेनसेटरी अॅफफॉरेस्टेशन क्षेत्र ०.२५१२ चौकिमी असे एकूण १७३३.०९०८ चौकिमी गोंदिया वन विभागाचे क्षेत्र आहे. तर वन्यजीव विभागाच्या नागझिरा सेंच्युरी १५३.६६३० चौकिमी, नवीन नागझिरा अभयारण्य ७२.८७१६ चौकिमी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान १२९.५५२० चौकिमी व नवेगाव अभयारण्य १२२.७५६७ चौकिमी असे एकूण ४७८.८४३३ चौकिमी वन्यजीव विभागाचे क्षेत्र आहे. तर एफडीसीएमचे क्षेत्र ३१४.९२९६ चौकिमी आहे.
वन विभागासह इतर सर्वच विभागांची शस्त्रे जिल्हास्तरावर एकाच शस्त्रागारात सुरक्षित राहत असतील तर काय बिघडते. शस्त्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा देखभालीसाठी अनेक विभागांकडे तशा कर्मचाऱ्यांची उपलब्धता नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर शस्त्रागारात वन विभागाची शस्त्रेसुद्धा सुरक्षित आहेत.’’
-डॉ.जितेंद्र रामगावकर,
उपवनसंरक्षक, वन विभाग, गोंदिया.