युरिया कुठं गेला? कृषी विभागाच्या दाव्यांवर शेतकऱ्यांचा अविश्वास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:58 IST2025-09-19T19:58:12+5:302025-09-19T19:58:55+5:30

कृषी विभाग म्हणतो टंचाई नाही : शेतकरी म्हणतात कुठे मिळतेय सांगा?

Where did urea go? Farmers distrust the claims of the Agriculture Department! | युरिया कुठं गेला? कृषी विभागाच्या दाव्यांवर शेतकऱ्यांचा अविश्वास !

Where did urea go? Farmers distrust the claims of the Agriculture Department!

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
खरीप हंगामातील धान गर्भावस्थेत असून, धानाच्या वाढीसाठी युरियाचा डोस देण्याची गरज आहे. पण, जिल्ह्यात युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. गोंदियासह इतर तालुक्यांत युरिया मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. मात्र, दुसरीकडे कृषी विभाग जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा असून, दोन दिवसांत पुन्हा युरिया खत येणार असल्याचे सांगत आहे. युरिया उपलब्ध आहे तर मग शेतकऱ्यांची ओरड का सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात यंदा खरिपात एक लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धानाची वाढसुद्धा चांगली आहे. सध्या धान गर्भावस्थेत असून, या कालावधीत शेतकरी धानाच्या वाढीसाठी युरियाचा डोस देतात. पण, यंदा वारंवार युरियाची टंचाई निर्माण होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यातसुद्धा गेल्या आठवडाभरापासून युरिया टंचाईची बोंब आहे, तर गोंदिया जिल्ह्यातसुद्धा मागील तीन-चार दिवसांपासून युरिया खत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. शेतकरी कृषी केंद्रावर युरिया खत घेण्यासाठी जात आहे. मात्र, तिथे गेल्यावर कृषी केंद्रधारक युरिया नसल्याचे सांगत आहे. हा प्रकार गोंदिया, सडक अर्जुनी, सालेकसा तालुक्यांत आहे. जिल्ह्यात ११०० वर कृषी केंद्रे आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे सध्या १७१३ मेट्रिक टन युरिया उपलब्ध आहे. तर पुन्हा दोन दिवसांत १२०० मेट्रिक युरियाची रॅक लागणार आहे. बुधवारी (दि. १७) सुद्धा जिल्ह्यात युरियाची रॅक लागली. या खताचे सर्व केंद्रांना वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता युरियाची टंचाई नसल्याचा दावा जि. प. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला.

ई-पॉस मशीनवर अपडेट नाही

खत विक्रीतील अनियमितता टाळण्यासाठी कृषी विभागाने सर्व कृषी केंद्रधारकांना ई-पास मशीनचे वितरण केले आहे. तसेच कुठल्या कृषी केंद्राकडे खताचा किती साठा उपलब्ध आहे याची माहिती कळावी यासाठी सॉफ्टवेअरसुद्धा तयार केले आहे. पण, ते वेळोवेळी अपडेट केले जात नसल्याने स्टॉक संपल्यानंतरही त्यावर स्टॉक उपलब्ध असल्याचे दाखवीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे.

Web Title: Where did urea go? Farmers distrust the claims of the Agriculture Department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.