बेवारटोला प्रकल्पाच्या कालव्याचे अर्धवट काम केव्हा पूर्ण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:31 IST2025-12-16T18:25:25+5:302025-12-16T18:31:49+5:30
२३ वर्षांपासून रखडले काम : प्रकल्पावर ९० कोटींचा खर्च

When will the partial work of the Bewartola project canal be completed?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील बेवारटोला धरणाचा कालवा हा परिसरातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे कालव्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल आ. डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
बेवारटोला धरणाचे काम सन २००२ मध्ये सुरू झाले. मात्र, सन २०२५ उजाडले तरीही या प्रकल्पातून अद्याप प्रत्यक्ष सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध झालेली नाही. ही गंभीर बाब त्यांनी सभागृहासमोर मांडली. या प्रकल्पामुळे सालेकसा, साकोली, अर्जुनी मोरगाव, गोंदिया व लांजी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र, कालव्याची कामे अपूर्ण राहिल्याने शेतकऱ्यांना आजही पाण्याअभावी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे ९० कोटी रुपयांचा खर्च झालेला असून, कालव्याचे काम अपूर्ण असल्यामुळे हा खर्च व्यर्थ गेल्याचा आरोप आ. डॉ. परिणय फुके यांनी केला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सिंचनाला या धरणाचा कोणताही प्रत्यक्ष लाभ झालेला नाही.
उर्वरित कालव्याची कामे नेमकी कधी पूर्ण होणार आणि त्यासाठी आवश्यक निधी केव्हा उपलब्ध करून दिला जाणार, असा थेट सवाल त्यांनी शासनाला केला. यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बेवारटोला प्रकल्पाला सन १९९३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. सन २०१८ मध्ये या प्रकल्पासाठी ९० कोटी रुपयांची सुप्रमा मंजूर करण्यात आली आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता १,३९० हेक्टर इतकी असून, त्यापैकी ९९५ हेक्टर क्षेत्रासाठीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कालव्याची कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण करा
निधीची तातडीने उपलब्धता करून कामांना गती देण्याची मागणी करत त्यांनी हा प्रकल्प ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावर मंत्री महाजन यांनी निधी उपलब्ध करून देऊन सहा महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा पुनरुच्चार सभागृहात केला.