व्हॉट्सअँपच्या नादात जुने खेळ झाले हद्दपार
By Admin | Updated: November 11, 2014 22:43 IST2014-11-11T22:43:54+5:302014-11-11T22:43:54+5:30
१५ वर्षांच्या पूर्वीचा काळ आठवल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने मिरविणारा एन्टीना, पाच-दहा-पंचेवीस पैशांची नाणी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे चित्र दिसत होते.

व्हॉट्सअँपच्या नादात जुने खेळ झाले हद्दपार
गोंदिया : १५ वर्षांच्या पूर्वीचा काळ आठवल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने मिरविणारा एन्टीना, पाच-दहा-पंचेवीस पैशांची नाणी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे चित्र दिसत होते. पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे सर्व खेळ व वस्तू लुप्त झाल्याचे चित्र आहे. या वस्तूंच्या आठवणी ताज्या करण्याकरिता आज केवळ चित्र आणि फोटोच उरले आहेत. यातही मोबाईलच्या माध्यमातून त्या आठवणी ताज्या होत असल्याचे दिसते.
सध्या व्हॉट्सअँप या अप्लीकेशनच्या माध्यमातून हे जुने फोटो एकमेकांना पाठवून तो काळ पाहिलेले युवक व वृद्ध जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचेच दिसून येत आहे. १० ते १५ वर्षांपूर्वी मैदानातील खेळांना अनन्यसाधारणमहत्त्व होते. यात सर्वच खेळांचा समावेश होत असला तरी सध्या केवळ क्रिकेट हाच खेळ चिमुकले खेळताना दिसतात. पूर्वी गिल्ली-दंडा हा खेळ मुलांमध्ये प्रसिद्ध होता. हल्ली हा खेळ कुठेही खेळला जात नसून त्यासाठी मैदानेही नाही, हे वास्तव आहे. लगोरी, लंगडी या खेळांचा प्रकार असलेला सातघर हे खेळ मुलींमध्ये त्या काळी प्रसिद्ध होते. सध्या मुलं-मुली प्रगत झाल्यागत वागत असल्याने हे जुनाट खेळ खेळले जात नाही. पूर्वी गल्ली-बोळात खेळले जाणारे लगोरी, लंगडी हे खेळ आता दिसेणासे झाले आहेत. आता मुला-मुलींमध्ये संगणक, मोबाईलवरील खेळांसह टीव्हीवरील व्हीडीओ गेम अधिक प्रसिद्ध झाले आहेत. बसल्या जागेवर खेळले जाणारे हे खेळ मुले खेळतात.
यात शरिराला कुठलाही व्यायाम होत नाही. उलट विकार वाढण्यास आणि शारिरीक विकास खुंटण्यास हे खेळ कारणीभूत ठरत आहेत. मानसिकरित्या नवीन पिढी प्रगत घडत असली तरी दिवसेंदिवस शारीरिकदृष्टया दोष असलेली मुले-मुली अधिक आढळून येत आहेत. मुलांमध्ये गिल्ली-दंड्यासह भोवरा हा खेळही मोठाच प्रसिद्ध होता. एकट्यानेही तो खेळता येत होता आणि चार-चौघे जमले तर त्यात धम्माल असायची.
पण सध्या प्लास्टीकचे भोवरे बाजारात मिळतात. या भोवऱ्यांना दोराने फिरवावेही लागत नाही. त्यासाठी तत्सम यंत्रही मिळते. यातही शरीराला व्यायामासाठी कुठेच वाव नाही. विविध आजारांवर औषध म्हणून काम करणारे खेळच लुप्त होत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. शाळांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल यासह अन्य खेळ खेळविले जात असून स्पर्धाही घेतल्या जातात. तेवढाच विद्यार्थ्यांना व्यायाम होतो; पण या मातीतील खेळातून होणारी कसरत बंद झाल्याचे चित्र आहे.
हल्ली मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवरच गतकाळातील मुला-मुलींच्या विविध खेळांतील गमती-जमती आणि आठवणी ताज्या होत असल्याचे दिसून येते. मित्र आपले ग्रुु तयार करून जुन्या आठवणी शेयर करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)