भवभूती जन्मस्थळाला संग्रहालयाची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 18, 2016 01:55 IST2016-05-18T01:55:38+5:302016-05-18T01:55:38+5:30
संस्कृत नाटककार महाकवी ‘भवभूती’ यांचे संस्कृत साहित्य जगविख्यात आहे. सातव्या शतकात आपल्या साहित्याची छटा उमटविणारे भवभूतीचे ‘पद्मपूर’ हे जन्मस्थान आजही उपेक्षित आहे.

भवभूती जन्मस्थळाला संग्रहालयाची प्रतीक्षा
पुरातत्त्व विभाग करणार विकास : इतिहासाची साक्ष देणाऱ्या मूर्ती भग्नावस्थेत
नरेश रहिले गोंदिया
संस्कृत नाटककार महाकवी ‘भवभूती’ यांचे संस्कृत साहित्य जगविख्यात आहे. सातव्या शतकात आपल्या साहित्याची छटा उमटविणारे भवभूतीचे ‘पद्मपूर’ हे जन्मस्थान आजही उपेक्षित आहे. इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे येथे सापडले. भवभूतीचे साहित्य अजरामर झाले असले तरी, जन्मभूमी उपेक्षित आहे. या स्थळाच्या विकासासाठी पद्मपूरला संग्रहालय तयार करण्याची मागणी भवभूती रिसर्च अॅकेडमीतर्फे केली आहे. संग्रहालयाअभावी येथील मूर्ती त्याच ठिकाणी कचरा-काडीत पडून आहेत.
सातव्या शतकाच्या उत्तरार्धात महाकवी भवभूतीचा जन्म विदर्भातील ‘पद्मपूर नगरी’ असल्याचा ठोस पुरावा ‘मालती माधव’ ग्रंथात सापडते. परंतु विदर्भात ७ पद्मपूर असल्याने भवभूतीच्या जन्मनगराविषयी अनेक तर्कविर्तक लावण्यात येत होते. पद्मपूर ही राष्ट्रकृट राजवंशाची राजधानी होती. भवभूतींवर जैन धर्माचा प्रभाव होता व यासंबंधी सबळ पुरावे आमगाव तालुक्यातील पद्मपूर येथे सापडल्याने हेच भवभूतीचे जन्मस्थान असल्याचे शिक्कामोर्तब झाले.
विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात २, भंडाऱ्यात ३ तर गोंदिया जिल्ह्यात २ असे ७ पद्दमपूर असल्यामुळे भवभूतीच्या इतिहास संशोधनाची रुची वाढत गेली. भवभूतीच्या पदमपूर नगरीला पुरातत्व विभागासह देशातील अनेक दिग्गजांनी भेटी दिल्यात. येथे जैन तिर्थकारांच्या मूर्ती, प्राचीन शारदेची मूर्ती, हिंदू देवी देवतांच्या मूर्र्ती, शिवमंदिराच्या बांधकामाचे अवशेष, नटराजची मूर्ती असे अनेक पुरावे पुरातत्व विभागाला सापडले. विशेष म्हणजे उत्खननात सापडलेली ‘नटराज’ ची मूर्ती १९५० च्या सुमारास नागपूरच्या संग्रहालयात ठेवण्यात आली. तत्पूर्वी १९४७ पुर्वी इंग्रजांनी भगवान आदिनाथांच्या दोन मूर्ती नेल्या व त्यांना भंडारा जिल्ह्यातील ‘कारधा’ (वैनगंगा) नदी काठावर बसविल्या. यापैकी एक मूर्ती तेथे असून दुसरी मुर्ती बेपत्ता आहे. विशेष म्हणजे पदमपूर येथे खंडीत स्वरुपात शारदेची मूर्ती असून ती खंडीत असली तरी इग्लंडच्या म्युझिममध्ये ठेवण्यात आले. भारतीय मूर्तीपेक्षाही सरस असल्याचा दावा आमगावचे इतिहासकार प्राचार्य ओ.सी. पटले यांनी केला आहे.
भवभूती उत्कृष्ठ गायक होते. उत्तरेकडील कन्नोज महाराजा ‘यशोवती’ने आपल्या दरबारी सभा कवी म्हणून त्यांची नेमणूक केली होती. ग्वालीयरच्या नैर्ऋत्येस ४२ कि.मी. अंतरावरील पदमवाया येथे भवभूतींचे शिक्षण झाले. येथेसुद्धा त्यांचे स्मारक असून त्याच ठिकाणी त्यांनी ‘मालतीमाधव’ हा ग्रंथ लिहिला. आमगावनजीकच्या नाथबाबा पहाडीवर साधना व साहित्य लेखन केले.
नागपूरच्या म्युझियममध्ये जाणार मूर्ती
केंद्राच्या पुरातत्त्व विभागाचे नागपूर उपमंडल येथून शासनाला नागपूर येथे मोठे संग्रहालय करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. भवभूतीचा राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर प्रचार व्हावा अशी अपेक्षा आहे. नागपूरच्या म्युझियम मध्ये पदमपूर येथील मूर्ती ठेवण्यात येतील असे पुरातत्व विभागातून सांगण्यात आले.
पदमपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या स्थळांचा विकास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाथबाबा पहाडीवर चढण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या. उर्वरित तीन ठिकाणी म्हणजे गणेशपूरच्या कालभूतीन येथे संरक्षक भिंत, पदमपूर येथील तुकाराम हुखरे यांच्या घरामागील परिसरात संरक्षण भिंत तर पदमपूरला पूर्वेकडे असलेल्या जैन मूर्तीच्या ठिकाणी ताराचे कुंपन करण्यात आले आहे. पर्यटक या ठिकाणी यावे यासाठी बगीचा तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा तयार करण्यात येणार आहे.
- मिलिंद अंगाईतकर
वरिष्ठ संरक्षण, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उपमंडळ नागपूर.