Wait for the express trains in Salecas | सालेकसात एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या

सालेकसात एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या

ठळक मुद्देपियूष गोयल यांना विनंती : अशोक नेते यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र


लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे लाईनच्या मुंबई-हावडा मार्गावरील सालेकसा एक तालुका स्थळाचे शहर असून सुध्दा येथील रेल्वे स्थानकावर केवळ दोनच एक्सप्रेस गाड्या थांबतात. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांना गरजेच्या वेळी रेल्वे गाडी उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र देऊन सालेकसात येथे दोन तीन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
विदर्भात गोंदिया शहर हे मध्य भारतातील एक मोठे व्यापारी केंद्र आहे. संपूर्ण जिल्ह्याचा व्यापार तसेच नजीकच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील अनेक तालुक्याचा व्यापार सुध्दा गोंदिया शहरावर अवलंबून आहे. सालेकसा हा मुंबई-हावडा मार्गावर छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या तालुका आहे.येथील रेल्वे स्टेशनवरुन व्यापारी वर्ग, नोकरदार, विद्यार्थी आणि सामान्य प्रवासी सुध्दा मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अशात येथे काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची गरज आहे.
रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्सप्रेस तसेच गोंदिया-बरौनी एक्सप्रेस गाडीला थांबा दिल्यास प्रवाशांना सोय होऊ शकते.त्यामुळे दुपारी गोंदियाकडे जाण्यासाठी तर सायंकाळी उशीरा सालेकसाला परत येण्यासाठी सोईस्कर होईल, सालेकसा रेल्वे स्टेशनवर सध्या हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेस व बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्सप्रेस या दोन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. परंतु या दोन्ही गाड्या तालुक्यातील व्यापारी व विद्यार्थ्याच्या दृष्टीकोनातून तसेच नोकरदार लोकांच्या कार्यालयीन वेळेला अनुरुप नसल्याने या गाड्यांचा तेवढा लाभ घेता येत नाही. अशात इतर एक्सप्रेस गाड्यांना सुध्दा थांबा देण्यात यावा अशी मागणी नेते यांनी केली आहे.

Web Title: Wait for the express trains in Salecas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.