vidhan sabha 2019 - The confidence to dominate the alliance and to distinguish the front | vidhan sabha 2019 - युतीला वर्चस्वाचा तर आघाडीला भेदण्याचा आत्मविश्वास

vidhan sabha 2019 - युतीला वर्चस्वाचा तर आघाडीला भेदण्याचा आत्मविश्वास

ठळक मुद्देविधानसभेचे रणांगण। प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, परिणय फुके यांचा लागणार कस, उमेदवारी जाहीर होण्याकडे लागले लक्ष

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषीत केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दिवाळीपूर्वीच निवडणुकीचा निकाल लागणार असणार कुणाचे फटाके वाजणार आणि कुणाचे फुसके ठरणार हे देखील तेवढेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून भाजपकडून निवडणूक लढवू इच्छीणाऱ्या उमेदवारांची भाऊ गर्दी देखील वाढली आहे. तर आघाडी देखील नव्या दमाने जोमाने कामाला लागली असून दमदार उमेदवार देऊन गड भेदण्याच्या आत्मविश्वासाने रणागंणात उतरली आहे.
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी गोंदिया वगळता इतर तीन मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेला एकमेव गोंदिया विधानसभा मतदारसंघाबाबत आ. अग्रवाल यांच्या पक्षांतराच्या चर्चेने प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. आ.अग्रवाल यांनी स्वत:अद्यापही पक्षांतर करण्याबाबत कुठलेच वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात सस्पेन्स कायम आहे. त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थेचे वातावरण आहे. मात्र आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात यावर या मतदारसंघाच्या लढतीचे बरेच चित्र अवलंबून असणार आहे. अग्रवाल यांनी पक्षांतर केल्यास त्यांना पर्याय शोधला जात असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय शिवणकर यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपकडून इच्छुकांची यादी बरीच लांब आहे. मात्र युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मतदासंघातील चित्र पुन्हा बदलू शकते. अर्जुनी मोरगाव मतदारसंघावर मागील दशकापासून भाजपचे वर्चस्व आहे. राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे या मतदारसंघातृून प्रतिनिधीत्व करीत आहे. मात्र मंत्रीमंडळाचा तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना त्यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यामुळे भाजप बडोले यांना पुन्हा संधी देऊन विजयाची हॅट्रीक साधण्याची संधी देत की नवा उमेदवार देत हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून भाजपकडून या मतदारसंघातून काही नावांची सुध्दा चर्चा आहे. आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघासाठी दावा केला जात आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता.त्यामुळे काँग्रेसकडून सुध्दा इच्छुकांची संख्या बरीच असून जागा वाटपाचा नेमका काय फार्मुला ठरतो, यावर सगळे गणित अवलंबून असेल. तिरोडा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून आ.विजय रहांगडाले हे प्रतिनिधीत्व करीत आहे. मात्र या मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता भाजपने प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहरा दिला आहे. त्याचीच पुनर्रावृत्ती या निवडणुकीत होण्याची चर्चा आहे. तर आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून आघाडीकडून सुध्दा काही नावाची चाचपणी सुरू आहे. आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून आ. संजय पुराम हे प्रतिनिधीत्व करीत आहे. या मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहता येते मतदारांनी प्रत्येकवेळी नवीन उमेदवाराला संधी दिली आहे. त्यातच भाजप पुराम यांच्यावर पुन्हा विश्वास ठेऊन त्यांना संधी देते की नवीन चेहरा देत यावर ते अवलंबून असणार आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असून त्यांच्याकडून दमदार उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे.युती आणि आघाडीच्या तिकीट वाटपानंतरच तिकीट वाटपाचे अंतीम चित्र स्पष्ट होईल.

जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघावर युतीचा झेंडा फडकावून वर्चस्व स्थापन करण्याचा युतीचा प्रयत्न असणार आहे. तर आघाडीला जिल्ह्यातील चारही मतदारसंघात दमदार उमेदवार देऊन विधानसभा निवडणुकीत युतीचा गड भेदण्याची रणनिती आखली आहे. सर्वाधिक चूरस गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. तर या निवडणुकीत खा.प्रफुल्ल पटेल,नाना पटोले आणि परिणय फुके यांच्या प्रतिष्ठेचा सुध्दा कस लागणार आहे.

विजयाची हॅट्रीक करणार का?
गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी तिनदा विजयी होऊन या मतदारसंघातून विजयाची हॅट्रीक साधली आहे.या मतदारसंघातून हॅट्रीक करणारे ते एकमेव उमेदवार आहेत. या निवडणुकीत ते रिंंगणात असणार आहेत. तर अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.राजकुमार हे यापूर्वी दोनदा निवडून आले असून या निवडणुकीत ते विजयाची हॅट्रीक करणार का हे याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या दाव्याने पेच
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीवर शिक्का मोर्तब झाले आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेने युती होणार म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे. मागील निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने जागा वाटपाचा पेच निर्माण झाला नव्हता. मात्र युती होण्याच्या पार्श्वभूमीवर गोंदिया विधानसभा मतदारसंघावर पुर्वीचा दाखला देत शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे या जागेवरुन भाजप-सेनेत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

संघटन कौशल्य पणाला
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर भाजप उमेदवाराला निवडून आणले होते. त्यामुळे या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे चार विधानसभा मतदारसंघावर युतीचा झेंडा रोवण्यासाठी त्यांच्या संघटन कौशल्याच्या कस लागणार आहे.

गोपालदास अग्रवाल यांचे पक्षांतर महत्त्वाचा मुद्दा
मागील २७ वर्षांपासून काँग्रेसचे आमदार असलेले गोपालदास अग्रवाल हे भाजपवासी होण्याच्या चर्चेला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेव फुटले. जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण बऱ्याच प्रमाणात त्यांच्या अवती भवती फिरते. त्यामुळे ते भाजपवासी होणार की काँग्रेसमध्ये राहून विजयाचा नवा इतिहास रचणार हा विषय सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नशिबी कम नशिबी
मागील विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघातून गोपालदास अग्रवाल यांनी ६२ हजार ७०१ मते घेऊन विजय मिळविला होता. तर भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांना ५१ हजार ५४९ मते
मिळाली होती.केवळ १० हजार मतांनी पराभव झाला होता.

प्रफुल्ल पटेल यांच्याभोवती केंद्र
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असणाºया उमेदवारांसाठी ही निवडणूक जेवढी महत्त्वाची असणार आहे. त्यापेक्षा ती राष्टÑवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, माजी खा.नाना पटोले आणि पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत हे कोणते डावपेच आणि संघटन कौशल्य वापरून जिल्ह्यातील राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवतात हे सुध्दा तेवढेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

वंचित आणि बसपाची चाचपणी
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि बसपाच्या उमेदवारांना फार मताधिक्य मिळाले नव्हते. मात्र राज्यात इतर ठिकाणी वंचितला मिळालेल्या मताधिक्यामुळे त्यांच्यात उत्साह असून त्यांनी चारही मतदार संघात उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज उमेदवाराला पक्षाचे तिकीट न मिळाल्यास ते वंचितचे उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: vidhan sabha 2019 - The confidence to dominate the alliance and to distinguish the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.