अर्धनारेश्वरालयात तुळशी विवाहाची अनोखी परंपरा

By Admin | Updated: November 3, 2014 23:27 IST2014-11-03T23:27:40+5:302014-11-03T23:27:40+5:30

हिंदू संस्कृतीत तुळशीविवाह झाला की उपवर-वधूंचे लग्न जुळविण्याच्या कामांना सुरूवात केली जाते. त्यामुळे तुळशीविवाहाची वाट अनेक जण पाहात असतात. अंगणातील तुळस आणि भगवान

Unique tradition of Tulsi wedding in Ardhanareshwar | अर्धनारेश्वरालयात तुळशी विवाहाची अनोखी परंपरा

अर्धनारेश्वरालयात तुळशी विवाहाची अनोखी परंपरा

नामदेव हटवार ल्ल सालेकसा
हिंदू संस्कृतीत तुळशीविवाह झाला की उपवर-वधूंचे लग्न जुळविण्याच्या कामांना सुरूवात केली जाते. त्यामुळे तुळशीविवाहाची वाट अनेक जण पाहात असतात. अंगणातील तुळस आणि भगवान कृष्णाचा विवाह लावण्याची ही परंपरा घरोघरी पाळल्या जाते. मात्र त्याला मर्यादित स्वरूप असते. फार तर शेजारच्या दोन-चार घरातील लोक वऱ्हाडी म्हणून या लग्नाला असतात. मात्र एखाद्या खरोखरच्या लग्नाला असावे अशा वऱ्हाड्यांच्या गराड्यात आणि लग्नाचे सर्व सोपस्कार केले जाणारा ‘तुळशी विवाह’ पहायला असेल तर हलबीटोल्यातील अर्धनारेश्वरालयात मंगळवारी जरूर या.
श्रमदानातून साकारलेल्या सालेकसा तालुक्यातील अर्धनारेश्वरालय या ठिकाणी २००४ पासून अशा पद्धतीने तुळशी विवाह भव्य स्वरूपात पार पाडण्याची प्रथा सुरू करण्यात आली. गतवर्षी ९०० वऱ्हाड्यांच्या साक्षीने हा समारंभ झाला होता. यावर्षी एक हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी खास विवाहपत्रिकाही छापण्यात आल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावातील लोकांसह नागपूरपासून रायपूरपर्यंतच्या अनेक लोकांनाही यासाठी निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.
तुळशी विवाहाच्या निमित्ताने मंडप टाकणे, परिसर सजविणे, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे, आदरातिथ्य करणे ही सर्व कामे करण्यात येतात. येणाऱ्या प्रत्येकासाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात येते. आतषबाजी, बँडबाजा असे सर्वच इथे पहायला मिळते. तुळशी आणि शालिग्राम (श्रीकृष्णाचे शापित रूप) च्या रुपातील काळा दगड यांच्यात अंतरपाट ठेवून हा विवाह समारंभ लावल्या जातो. विवाहाच्यावेळी विधी पूर्वधक मंत्रपठण लांजी (ककोडी) येथील विश्वनाथ तिवारी महाराज पार पाडत असतात. मंगलाष्टकेही म्हटल्या जातात.
मांडव सोन्याचा घातिला,
किस्रदेव हा उभा राहिला
हाती शोभे वरमाला
अशी लग्नाची गाणीही वऱ्हाड्यांना ऐकायला मिळतात. त्यात तुळशीचे महत्व विषद करताना
जिला नाही लेक, तिने तुळस लावावी,
तिच्या दारी येई, गोविंद लेक-जावई
अशी गीतेही ऐकायला मिळतात. तुळशी विवाहाचे महत्व सांगण्यासोबतच हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठीही जनजागृती केली जाते. एका बाजूला मुलगा हवा म्हणून स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत असताना कन्यादानाखेरीज जीवनाचे सार्थक नाही याचेही महत्व या ठिकाणी सांगितले जाते.

Web Title: Unique tradition of Tulsi wedding in Ardhanareshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.