गोंदिया जिल्ह्यात दोन शिक्षकांचे झाडावर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:32 PM2019-08-17T15:32:25+5:302019-08-17T15:36:31+5:30

आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आजवर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केली गेली. गोंदिया जिल्ह्यातील दोन शिक्षकांनी त्यात झाडावर चढून बसण्याचे आंदोलन आज समाविष्ट केले आहे. 

Two teachers climbed a tree in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात दोन शिक्षकांचे झाडावर चढून आंदोलन

गोंदिया जिल्ह्यात दोन शिक्षकांचे झाडावर चढून आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देतब्बल दीड तास झाडावर मांडले ठाण लेखी आश्वासनानंतर माघार १२ वर्षांपासून वेतनापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विना अनुदानीत शाळेच्या दोन शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक जि.प.च्या आवारातील झाडावर चढून आंदोलन केले. यामुळे जि.प.प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. जोपर्यंत आमच्या खात्यावर वेतन जमा केले जात नाही आणि मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत झाडावरुन खाली उतरणार नाही.अशी भूमिका या दोन्ही शिक्षकांनी घेतली होती.अखेर उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल दीड तासानंतर दोन्ही शिक्षक खाली उतरले.
एन.सी.मच्छीरके आणि भास्कर लांजेवार असे झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या विना अनुदानीत शाळेच्या शिक्षकांची नावे आहे. मागील तेरा चौदा वर्षांपासून आम्ही विना वेतन विद्यार्थ्यांना विद्या ज्ञानाचे काम करीत आहोत.शासनाने वेळावेळी आम्हाला वेतन आणि इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची पुर्तत: अद्यापही केली नाही. त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मागील बारा वर्षांपासून आम्ही उधार उसणवारी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहोत. मात्र आता ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना सुध्दा ते परत द्यायचे आहे.आधीचेच कर्ज असल्याने आता नवीन कर्ज कोण देणार अशी स्थिती विना अनुदानीत शाळेतील शिक्षकांची आहे. वांरवार आंदोलने आणि निवेदन देऊन सुध्दा शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही.त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे या दोन्ही शिक्षकांनी सांगितले. या दोन्ही शिक्षकांनी जि.प.च्या आवारातील एका झाडावर चढून आंदोलन केले.त्यामुळे जि.प.मध्ये काही वेळ चांगलीच तारांबळ उडाली होती. या दोन्ही शिक्षकांना झाडावरुन खाली उतरण्याची विनंती त्यांचे सहकारी, जि.प.चे अधिकारी आणि पोलीस करीत होते. मात्र जोपर्यंत आमच्या खात्यावर दोन दिवसात वेतन जमा होण्याचे आणि इतर मागण्या मंजूर करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका या शिक्षकांनी घेतली होती. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. तर झाडावरील शिक्षक उडी मारुन खाली पडू नये यासाठी झाडाच्या खाली जाळी लावण्यात आली होती. चोख पोलीस बंदोबस्त सुध्दा तैनात करण्यात आला होता.अखेर जि.प.शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन्ही शिक्षक तब्बल दीड तासाने खाली उतरले. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

एका शिक्षकाला आली भोवळ
झाडावर चढलेल्या दोन शिक्षकापैकी एका शिक्षकाला झाडावरुन खाली उतरताच भोवळ आली. त्यामुळे त्या शिक्षकाला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या आहेत प्रमुख मागण्या
महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक मागील्बारा वर्षांपासून बिन पगारी काम करीत आहेत. त्यामुळे शासनाने या शाळांना त्वरीत अनुदान द्यावे,शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत पगार जमा करावा यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.

मागील पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू
विना अनुदानीत शाळेच्या शिक्षकांचे मागील पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.शुक्रवारी या शिक्षकांनी गोंदिया येथे भिक मांगो आंदोलन केले. तसेच पालकमंत्र्यांना सुध्दा निवेदन दिले.पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेत सहभागी असलेल्या दोन शिक्षकांनी झाडावर चढून आंदोलन केले.

Web Title: Two teachers climbed a tree in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.