सडक अर्जुनी (गोंदिया) : धावत्या कारवर रस्त्यालगतचे झाड कोसळल्याने कारमधील दोन जण ठार तर तीन जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.९) सकाळी ८:३० वाजता शहरातील आराम मशीनसमोर घडली. वासुदेव खेडकर (५७), आनंदराव राऊत (४५) रा. सडक अर्जुनी असे या घटनेत ठार झालेल्यांची तर रितिक दिघोरे (२२) रा. सडक अर्जुनी, राजू रूपलाल चौरागडे , अनिल रामकृष्ण चौधरी असे अपघातात जखमी झालेल्यांची नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वासुदेव खेडकर, आनंदराव राऊत आणि कार चालक रितीक दिघोरे हे बुधवारी सकाळी कार क्रमांक एमएच ३१, सीआर १५४९ ने उमझरी मध्यम प्रकल्प येथे मासे आणण्यासाठी जाणार होते. उमझरी येथे जाण्यापुर्वी त्यांनी सडक अर्जुनी येथील पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरले. यानंतर ते पेट्रोल पंपावरुन उमझरीकडे जाण्यासाठी निघत असताना अचानक येथील आराममशीन समोरील रस्त्यालगतचे एक झाड त्यांच्या कारवर कोसळले. यात कारमधील वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रितीक दिघोरे हा गंभीर जखमी झाला. कारवर झाड कोसळल्यामुळे कारचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला. तर याच सुमारास गोंदियाहून नागपूरकडे जात असलेल्या इनोव्हा वाहन क्रमांक एमएच ३१ एफव्ही ७३४१ या वाहनावर सुध्दा झाडाची फांदी पडल्याने गाडीत बसलेले राजू रूपलाल चौरागडे (४६) व अनिल रामकृष्ण चौधरी रा. गोंदिया हे जखमी झाले आहेत. त्यांच्याही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना घडताच पेट्रोल पंपाजवळील व रस्त्यावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील जखमीला बाहेर काढले. यानंतर १०८ रुग्णवाहिका बोलावून जखमींना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी घेतली आहे.
संततधार पावसामुळे झाड कोसळलेसडक अर्जुनी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. येथील रस्त्यालगत जुनी २० ते २५ झाडे असून संततधार पावसामुळे ती उमळून पडल्याचे बोलल्या जाते. चिचव्याचे झाड हे फार जुने असून हेच कारवर कोसळल्याने दोन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.