मोटारसायकलची उभ्या ट्रकला धडक, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 21:00 IST2019-12-30T21:00:07+5:302019-12-30T21:00:30+5:30
निमगाव येथील बसस्थानकासमोर उभ्या ट्रकला मोटारसायकलने जोरदार धडक दिली

मोटारसायकलची उभ्या ट्रकला धडक, दोघांचा मृत्यू
बोंडगावदेवी (गोंदिया) - उभा असलेल्या एका ट्रकला भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे सोमवारी (दि.३०) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. देवानंद देवराम मेश्राम (२०) इसापूर-इटखेडा, समीर अरुण मेश्राम (१७) रा.नान्होरी दिघोरी असे अपघातात ठार झालेल्या युवकांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार ईसापूर-इटखेडा येथील देवानंद मेश्राम हा नात्यातील मेव्हणा लागत असलेल्या नान्होरी-दिघोरी येथील समीर मेश्रामसह टीव्हीएस मोटारसायकल क्रमांक एमएच३५/जे-१८६३ ने अर्जुनी-मोरगाव ते साकोली मार्गाने जात होते. निमगाव येथील बसस्थानकासमोर सीजी०४/सी-२२६३ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकला देवानंदच्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वार देवानंद व समीर या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते, बीट अंमलदार कन्नाके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.