लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात गाजत असलेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्याचे धागेदोरे गोंदिया जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील एका संस्थेच्या शिक्षकाची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, 'एसआयटी'चे पथक येणार असल्याची माहिती मिळताच संबंधित प्रकरणातील एक शिक्षक फरार झाल्याचे कळते.
'एसआयटी'च्या पथकाने नुकतीच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव परिसरात अचानक धाड टाकली, या धाडीनंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईदरम्यान एसआयटीने महागाव येथील एका शिक्षकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या शिक्षकाला पथकाने एका गोपनीय ठिकाणी नेऊन तब्बल आठ तास सखोल चौकशी केली.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगात
एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने करण्यात येत आहे. डिजिटल पुरावे, बँक व्यवहार, तसेच शासकीय कागदपत्रांची छाननी सुरू आहे. 'शालार्थ आयडी' मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोट्या नियुक्त्या आणि आर्थिक गैरव्यवहारांचा घोळ उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सक्करदरा पोलिसांनी बजावली चौकशीची नोटीस
शालार्थ आयडी घोळप्रकरणी आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संस्था एसआयटीच्या रडावर असल्याची माहिती आहे. तर याप्रकरणी नागपूर पोलिस आयुक्तांकडेसुद्धा तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सक्करदरा पोलिसांनी याशी निगडीत आठ ते दहा जणांना नोटीस देत चौकशीसाठी बोलविल्याची माहिती आहे.
चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची पडताळणी तसेच 'शालार्थ आयडी' मिळवण्याच्या प्रक्रियेतील अनियमितता याबाबत तपशीलवार माहिती घेतल्याचे समजते. दीर्घ चौकशीनंतर प्राथमिक माहितीच्या आधारे संबंधित शिक्षकाला सध्या सोडून देण्यात आले असले, तरी तपास यंत्रणेच्या रडारवर तो असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसआयटीचे पथक गोंदियात दाखल झाल्याची माहिती समोर येताच या घोटाळ्याशी संबंधित इतर संशयित आरोपींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाईच्या धास्तीने काहीजण जिल्ह्याबाहेर निघून गेल्याची माहिती आहे. काही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आल्याची माहिती आहे.
Web Summary : SIT investigates Gondia institutions in the Shalarath ID scam. Raids uncover leads, one teacher questioned for eight hours. Police scrutinize documents and bank transactions, and some suspects are absconding, fearing arrest.
Web Summary : शालार्थ आईडी घोटाले में एसआईटी ने गोंदिया के संस्थानों की जांच की। छापे में सुराग मिले, एक शिक्षक से आठ घंटे पूछताछ की गई। पुलिस दस्तावेजों और बैंक लेनदेन की जांच कर रही है, कुछ संदिग्ध गिरफ्तारी के डर से भाग रहे हैं।