दारावर रोखला दोन तास मृतदेह

By Admin | Updated: August 10, 2015 01:14 IST2015-08-10T01:14:51+5:302015-08-10T01:14:51+5:30

साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी असलेल्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्यामुळे येथील रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Two hours of dead body were closed | दारावर रोखला दोन तास मृतदेह

दारावर रोखला दोन तास मृतदेह

केटीएसमधील प्रकार
आरएमओ अनिल परियालला निलंबित करण्याची मागणी
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

गोंदिया : साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी असलेल्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्यामुळे येथील रूग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांच्या हलगर्जीपणामुळे तरूणाचा मृत्यू झाला. यामुळे आरोग्य यंत्रणेविरूध्द असंतोष व्यक्त करून मृताच्या नातेवाईकांनी दोन तास मृतदेह रोखून धरला.
दवनीवाडा येथील नूतनकुमार राजू लोणारकर (२५) या तरूणाने १ आॅगस्ट रोजी विषप्राशन केल्यामुळे त्याला गंभीर अवस्थेत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. परंतु ८ आॅगस्टच्या रात्री विद्युत पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे उपचार होऊ शकला नाही. परिणामी माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरूणाचे वडील राजू लोणारकर व काका रेवा लोणारकर यांनी केला आहे. शासनानतर्फे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाला वर्षाकाठी कोट्यवधी रूपयाचा निधी देण्यात येतो. परंतु विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास येथे रूग्णांच्या नातेवाईकांनाच विजेची सोय करावी लागत असल्याची खंत मृत नूतनकुमारच्या वडीलांनी व्यक्त केली. नूतनकुमार याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. अवघ्या दोन दिवसात डॉक्टर सुट्टी देणार होते. मात्र विद्युत गेली तेथील डॉक्टरांनी आॅक्सिजन न लावल्यामुळे नूतनकुमारचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला. नूतनकुमारला आॅक्सिजन लावण्यासाठी नूतनकुमारच्या वडिलांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांना फोन केला असता डॉक्टर परियाल यांनी मृताच्या नातेवाईकांचे समाधान न करता त्यांच्याशी उर्मट वागणूक केली. सरकार जेव्हा पैसे पाठविल तेव्हा लाईट सुरू करू, आम्ही कुठले पैसे आणणार, जनरेटरमध्ये डिझेल टाकायला पैसे नाहीत असे बोलून त्यांनी त्या मृताच्या नातेवाईकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी मृताचे नातेवाईकांमध्ये आरोग्य यंत्रणेच्या प्रती आक्रोश होता. डॉ. अनिल परियाल यांना रात्री १०.२५ वाजता मृताचे काका रेवा लाणारकर यांनी फोन लावला, परंतु त्यांच्याशी उध्दट वागणूक करण्यात आली. रूग्णाचा योग्यवेळी उपचार न झाल्यामुळे नूतनकुमारचा रात्री ११.३० वाजता दरम्यान मृत्यू झाला. नूतनकुमारच्या मृत्यूनंतर आरोग्य प्रशासनाप्रती आक्रोश व्यक्त होऊ लागला. यावेळी बजरंग दलाचे प्रांत संयोजक देवेश मिश्रा, सहसंयोजक वसंत ठाकूर, पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे व मृतांच्या नातेवाईकांनी सकाळी ११ वाजता उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेहाला जिल्हा शल्य चिकित्सकाच्या कक्षाकडे जाणाऱ्या दारावर तब्बल दोन तास मृतदेह मृतदेह रोखून धरला. जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांना त्वरित निलंबित करा या मागणीला घेऊन जिल्हा सामान्य रूग्णालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आ. खुशाल बोपचे, जि.प.च्या आरोग्य सभापती रचना गहाणे उपस्थित झाल्या. (तालुका प्रतिनिधी)
चौकशी करण्याची दिली कबुली
नूतनकुमार लोणारकर या तरूणाचा मृत्यू आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून होत असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आरोप सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी दिल्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला.
संभाषणामुळे घडला सदर प्रकार
मृत पावलेल्या तरूणाने विष प्राशन केले होते. त्याचा मृत्यू हलगर्जीमुळे की विषामुळे झाला हे चौकशीत निष्पन्न होईलच. परंतु मृताच्या नातेवाईकांच्या भावना अत्यंत संवेदनशील असताना डॉ. अनिल परियाल यांनी मृताच्या नातेवाईकांशी दुरध्वनीवरून केलेल्या उर्मट वागणूकीमुळे नातेवाईकांचा तीव्र आक्रोश वाढला. परिणामी त्यांनी त्या डॉक्टरला निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन दोन तास केटीएसच्या दारावरच मृतदेह रोखून कारवाई करण्याची मागणी केली. उद्धट पध्दतीच्या संभाषणामुळे हा प्रकार घडल्याचे तेथे बोलले जात होते.
एक्स्प्रेस फिडरचे काय झाले?
प्रत्येक आरोग्य संस्थेत २४ तास वीज व पाण्याची सोय असते. जिल्हा सामान्य रूग्णालयात विजेची २४ तास सोय नसल्यामुळे रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च करून गंगाबाई व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयासाठी एक्स्प्रेस फिडर लावण्यात आले होते. त्यानंतर गंगाबाई किंवा केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास एक्स्प्रेस फिडरच्या माध्यामातून विद्युतची सोय होणार होती. परंतु एक कोटी खर्ची घातलेल्या एक्स्प्रेस फिडरचे काय झाले? लाईट गेल्यामुळे रूग्णांचा मृत्यू होत असेल तर या एक्स्प्रेस फिडरचा उपयोग काय असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गोंदिया शहर अत्यंत संवेदनशील असल्यामुळे येथे कोणत्या ना कोणत्या प्रकारे घटना घडत असतात. हा प्रकार घडताच गोंदिया शहर पोलिसांनी रूग्णालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा शल्यचिकित्सकांनी मृतांच्या नातेवाईकांना चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे प्रकरण शांत झाले.
मृताच्या वडिलांनी दोन दिवस केली लाईट दुरूस्त
नूतनकुमार अतिदक्षता कक्षात भरती होता. त्या कक्षातील विद्युत पुरवठा मागील दोन दिवस खंडीत झाला होता. तेथील लाईट फिटींगमध्ये बिघाड असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याचे कळल्यामुळे नूतनकुमारच्या वडिलांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. परियाल यांना सांगितले. परंतु त्यांनी आम्ही पैशाची मागणी शासनाकडे केली आहे. पैसा आल्याशिवाय लाईट दुरूस्त होणार नाही असे डॉ. परियाल म्हणाले. त्यावर राजू लोणारकर यांनी आपल्या खिशातील पैसे टाकून रूग्णालयाचा विद्युत पुरवठा केल्याची आपबिती राजू लोणारकर यांनी सांगितली.

Web Title: Two hours of dead body were closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.