ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार; ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार
By अंकुश गुंडावार | Updated: October 26, 2023 19:39 IST2023-10-26T19:39:21+5:302023-10-26T19:39:38+5:30
देवरी-चिचगड मार्गावरील घटना

ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार; ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार
देवरी : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार दोन तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.२६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास देवरी-चिचगड मार्गावरील अब्दुलटोला गावाजवळ घडली. रूपलाल नत्थू चौधरी (३२) रा. पितांबरटोला, सहदेव नीलकंठ मांदाडे (३०) रा. मरामजोब, ता. देवरी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रुपलाल व सहदेव हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६,एसी ३२५७ ने गुरुवारी दुपारी चिचगडकडून देवरीकडे जात होते. दरम्यान अब्दुलटोला गावाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिलीे. ही धडक एवढी जोरदार होती की घटनास्थळावरच रुपलाल आणि सहदेव यांचा मृत्यु झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळी न थांबता ट्रक घेवून पसार झाला. दरम्यान या घटनेची माहिती गावकऱ्यांनी देवरी पोलिसांना दिली.
माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ट्रकचा शोध घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी देवरी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच माजी आ. संजय पुराम व उपसभापती अनिल बिसेन यांनी घटनास्थळी पोहचून मृतकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली.
कुटुंबीयांना नव्हती माहिती
रुपलाल व सहदेव हे दाेघेही मित्र असून ते शेतीचे काम करतात. गुरुवारी दुपारी घरच्यांना कुठलीही माहिती न देता दुचाकीने बाहेरगावी गेले होते. ते नेमके कुुठे गेले होते याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा नव्हती असे त्यांच्या नातेवाईकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.