मानव विकास बसेसचा प्रवास जिल्ह्याबाहेर
By Admin | Updated: May 7, 2015 00:31 IST2015-05-07T00:31:25+5:302015-05-07T00:31:25+5:30
मानव विकास कार्यक्रमाच्या बसेस २१५ दिवस स्कूल बस म्हणून धावतात. उर्वरित दिवस त्या बसेसचा उपयोग केवळ .....

मानव विकास बसेसचा प्रवास जिल्ह्याबाहेर
नियमांना बगल : जैन यांनी केली कारवाईची मागणी
गोंदिया : मानव विकास कार्यक्रमाच्या बसेस २१५ दिवस स्कूल बस म्हणून धावतात. उर्वरित दिवस त्या बसेसचा उपयोग केवळ जिल्ह्यांतर्गत प्रवाशी सेवेसाठी करावा, असे परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांचे निर्देश आहेत. मात्र नियमांना बगल करत गोंदिया, साकोली व भंडारा आगाराच्या स्कूल बसेस जिल्ह्याबाहेर प्रवाशी सेवेसाठी पाठविण्यात येत असल्याचा आरोप देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी केला आहे.
बारावीपर्यंत शिक्षण घेणे सोपे व्हावे, गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत शासन मान्य माध्यमिक शाळेच्या वेळापत्रकानुसार मुलींसाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळास बस विकत घेण्यासाठी शासनामार्फत अनुदान उपलब्ध करून दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी प्रतितालुका पाच बसेस याप्रमाणे ४० बसेस शासनाने परिवहन महामंडळास दिले. यापैकी गोंदिया आगाराला चार तालुक्यांसाठी २० बसेस, तिरोडा आगाराला पाच बसेस, देवरी, सडक-अर्जुनी व मोरगाव-अर्जुनी या तीन तालुक्यांसाठी साकोली आगाराला १५ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुलींना शाळेत वे-आण साठी बसेस नियमित वेळेत येणे अपेक्षित आहे. विलंब होणार नाही याची काळजी संबंधित आगार व्यवस्थापकांनी घेणे आवश्यक आहे. या वेळेत स्कूल बसचा वापर प्रवाशी वाहतुकीसाठी केला जाणार नाही, याचीसुद्धा दक्षता घेण्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांची आहे. शालेय सुट्ट्या वगळून सर्वसाधारणपणे २१५ दिवसांच्या व्यतिरिक्त या स्कूल बसचा वापर तालुक्यातच प्रवाशी वाहतुकीसाठी करावा, मानव विकासच्या निळ्या बसेस जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतुकीसाठी करू नये, भंडारा ते नागपूर, गोंदिया ते नागपूर, देवरी ते नागपूर, नागपूर ते आमगाव अशा प्रवासासाठीसुद्धा एका जिल्ह्याची बस दुसऱ्या जिल्ह्यात अजिबात चालविण्यात येऊ नये, असे नियम आहेत.
देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी २३ व २३ एप्रिल २०१५ रोजी सदर तिन्ही आगाराच्या व्यवस्थापकांना, विभागीय नियंत्रक भंडारा तसेच प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर यांची प्रत्यक्ष भेट घेवून याबाबत लेखी तक्रार केली. तसेच आपणास या बसेस जिल्ह्याबाहेर चालविण्याचा अधिकार आहे काय? असे विचारल्यावरही जैन यांना तक्रारीचे अद्याप उत्तर प्राप्त झाले नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे गोंदियाचे आगार व्यवस्थापक हे या बसेस जिल्ह्याबाहेर चालविण्याचे नियम नसतानासुद्धा राज्याबाहेर चालवित आहेत. गोंदिया ते रजेगाव (मध्य प्रदेश) मानव विकासची बस चालविली जात आहे.
नरेश जैन यांनी परिवहन मंत्री, पालकमंत्री, आ. गोपालदास अग्रवाल, आ. राजेंद्र जैन, आ. संजय पुराम, एसटीचे महाव्यवस्थापक मुंबई आदींकडे तक्रारीच्या प्रत पाठविल्या असून चौकशी करण्याची व दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
आदेशाचा भंग झाल्यास निलंबनाची कारवाई
प्रधान सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर २०१३ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशाबाबत महाव्यवस्थापक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई यांचे पत्र (राप/वाह/मानव विकास सेवा/६३८४ दि.०१/१०/२०१३) नुसार, मानव विकासच्या बसेस कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याबाहेर चालविल्या जावू नयेत. या आदेशाचा भंग झाल्यास गंभीर दखल घेण्यात येवून संबंधित आगार व्यवस्थापकावर संबंधित आगार व्यवस्थापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित विभाग नियंत्रक यांनाही शिस्त व आवेदन कार्यपद्धती अंतर्गत जबाबदार धरण्यात येईल, याची नोंद घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. मात्र गोंदिया, साकोली व भंडारा आगार व्यवस्थापक या आदेशाची अवहेलना करून नियमांना बगल देत आपल्या मनमर्जीप्रमाणे आदेशाचा गैरवापर करून मानव विकासच्या स्कूल बसेस आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बिनधास्त चालवित आहेत. तसेच अनेक आगारातील स्कूल बसेसची स्पीड उघडण्यात आली असून हे नियमाबाहेर असल्याचे जैन यांचे म्हणणे आहे.