दर १० मिनिटाला ट्राफिक जाम

By Admin | Updated: October 13, 2014 23:23 IST2014-10-13T23:23:57+5:302014-10-13T23:23:57+5:30

दिवाळीदरम्यान शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शहरातील रस्ते आधीच अरुंद असल्याने दर १० मिनिटाला ट्राफीक जाम चित्र पहायला मिळत आहे.

Traffic jam every 10 minutes | दर १० मिनिटाला ट्राफिक जाम

दर १० मिनिटाला ट्राफिक जाम

गोंदिया : दिवाळीदरम्यान शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शहरातील रस्ते आधीच अरुंद असल्याने दर १० मिनिटाला ट्राफीक जाम चित्र पहायला मिळत आहे. मात्र वाहतुकीची ही कोंडी सोडवण्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेला यश आलेले नाही. शहरातील मार्केट परिसरात होणारा हा ट्राफीक जाम होऊ नये यासाठी सुरू केलेले सर्वच प्रयत्न फसले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
गोंदिया शहर बाजारपेठेकरिता प्रसिध्द असून मिनी मुंबई म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्हाभरातीलच नाही तर जिल्ह्याबाहेरील नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्याकरिता शहरात येत असतात. शहरातील बाजारपेठ प्रामुख्याने गोरेलाल चौक, दुर्गा चौक, गांधी चौक, गंज बाजार, चांदणी चौक या परिसरात वसलेली आहे. त्यामुळे दिवाळीदरम्यान दरवर्षी या परिसरात प्रचंड गर्दी असते. शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यापर्यंत वाढविली आहे. बऱ्याच व्यावसायिकांनी वाहन तळाकरिता आपल्या दुकानांसमोर जागाच सोडलेली नाही.
वर्दळीच्या दिवसांत बाजारपेठ परिसरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर बंदी नसल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते. परिणामी बाजारपेठेत ट्राफीक जाम होणे तय आहे. वाहतूक नियंत्रण विभागाकडून दिवाळीदरम्यान शहरातील बाजारपेठ परिसरात बॅरिकेटस् लावून तसेच काही ठिकाणी वाहतूक नियंत्रण शिपायांची नियुक्ती करून वाहतूकीला सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. तर यासोबतच ‘वन साईड पार्किंग’चा प्रयोग देखील बाजार भागात सुरू आहे.
वाहतूक नियंत्रण विभागाकडून वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून अशा विविध उपाययोजना केल्या जातात. एवढेच नाही तर नियत्र्ांण विभागाचे वाहन देखील शहरात दिवसातून दोन तीन वेळा फिरत असते. मात्र या विभागाचे कर्मचारी वाहनातूनच केवळ फुटपाथ व्यावसायिकांना समज देऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींवरच कारवाई करुन मोकळे होतात.
वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे योग्य नियोजन न केल्याने याचा फटका वाहनचालक व ग्राहकांना सहन करावा लागतो. विशेष म्हणजे ज्या कालावधीत शहरात वाहनांची वर्दळ अधिक असते नेमके त्याच वेळेस या वाहतूक नियंत्रण विभागाने नियुक्त केलेले शिपाई आपल्या जागेवर नसतात. काही जण गाडीचालकांकडून चलान फाडण्यात व्यस्त असतात. त्यामुळे वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे.
गोरेलाल चौक, दुर्गा चौक, गांधी चौक, गंज बाजार, चांदणी चौक या भागातून दुपारच्या वेळेस वाहनचालकांना व बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना मोठे अग्निदिव्यच पार करुन यावे लागते. ज्या व्यावसायिकांनी रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले आहे ते देखील आपले अतिक्रमण काढून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करीत नाहीत. त्यामुळे विस्कळीत वाहतुकीवरुन अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. काही पालक आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या हाती वाहने देतात. त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती नसल्याने अनागोंदी वाहतूक व्यवस्थेत आणखीच भर पडत आहे.
शहरातील विस्कळीत वाहतुकीला जेवढा वाहतूक नियंत्रण विभाग जबाबदार आहे तेवढेच या शहरातील नागरिक, व्यापारी व नगर प्रशासन देखील जबाबदार ठरत आहेत. एकंदरीत वाहतूक नियंत्रण विभागाचे शहरातील वाहतूकीवरील नियंत्रण सुटले असून त्यामुळेच बाजार परिसरात दर १० मिनिटाला ट्राफीक जाम होतो.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Traffic jam every 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.