आॅगस्ट क्रांतीची मशाल विझली!
By Admin | Updated: August 9, 2015 01:47 IST2015-08-09T01:47:05+5:302015-08-09T01:47:05+5:30
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट, ...

आॅगस्ट क्रांतीची मशाल विझली!
क्रांती दिन नावापुरताच : हुतात्म्यांचे स्मरण झाले औपचारिकता, नवीन पिढीही अनभिज्ञ
लोकमत दिन विशेष
गोंदिया : इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. एवढेच काय प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे.
दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ आॅगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो. परंतु आज या दिवसाचे महत्व नवीन पिढीलाच नाही, तर नेते-पुढाऱ्यांनाही राहिलेले नाही.
व्यापारी शहर गोंदियात बहुतांश लोक एकमेकांशी वागताना कामाशी काम ठेवतात. या शहरातील अनेक व्यापाऱ्यांना तर ‘आॅगस्ट क्रांती दिन’ काय आहे हे सुद्धा माहीत नाही. गणराज्य दिन किंवा स्वातंत्र्य दिनाला जास्तीत जास्त ठिकाणी झेंडा भडकविण्याची स्पर्धा लागणाऱ्या नेते मंडळींनाही क्रांती दिनाची आठवण राहात नाही. त्यामुळे हा दिवस केवळ औपचारिकता म्हणून पाळल्या जात आहे. केवळ बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिलेले स्वातंत्र्य सैनिक या दिवशी आवर्जून हुतात्मा स्मारकात एकत्र येताना दिसतात.
गोंदिया शहरातील सुभाष गार्डनमध्ये भोला अनंतराव किराड यांचे, गोरेगाव तालुक्यात कुऱ्हाडी येथे जान्या-तिम्या या बंधूंचे आणि तिरोडा येथील शंकरदयाल मिश्रा या हौतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यात तीन ठिकाणी ४० वर्षापूर्वी हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत. मात्र आज ही स्मारके अडगळीत पडली आहेत. त्यांच्यापासून देशप्रेमाची प्रेरणा घेणे तर दूर, त्यांची साधी देखभाल सुद्धा केली जात नाही. त्यामुळे ही हुतात्मा स्मारके आपल्याच दुर्दशेवर अश्रू ढाळत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
नेत्यांची अशीही उदासीनता
ज्या हुतात्म्यांमुळे आज आपण सुखाने स्वातंत्र्य उपभोगत आहे त्या हुतात्म्यांच्या स्मृतीला वर्षातून एक वेळही अभिवादन करण्यासाठी कोणी नेते हुतात्मा स्मारकांत जात नसल्याचे विदारक सत्य जिल्हाभरात दिसून येत आहे. त्यामुळे हुतात्मा स्मारकांची काय दुरवस्था आहे हेसुद्धा त्यांना माहीत नाही. कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे मोठे अभिमानाने सांगणारे नेते मंडळी हुतात्म्यांच्या स्मारकाच्या दुरवस्थेबद्दल मात्र कमालीचे उदासीन आहेत.
- जिल्ह्यातील हुताम्यांचा इतिहास
तिरोडा येथील शंकरदयाल मिश्रा यांनी आपल्या उमेदीच्या काळात स्वत:ला स्वातंत्र्यलढयात झोकून देऊन गांधीवादी मार्गाने इंग्रज सरकारविरूध्द लढा दिला. त्यांना इंग्रज सरकारने अटक करून जबलपूरच्या कारागृहात टाकले़ मोडेन पण वाकणार नाही असा त्यांचा बाणा होता़ कारागृहातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट भोजनाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर त्यांना मरणयातना देण्यात आल्या. त्यांना नंतर रूग्णवाहिकेने तिरोडयाला आणून सोडण्यात आले़ त्यानंतर अल्पावधीतच दि़१९ एप्रिल १९४३ ला त्यांची प्राणज्योत मालवली़ ते १०० दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा ८ दिवस वाघासारखे जगले़ मात्र नवीन पिढीला त्यांच्या स्मारकातून ही प्रेरणा घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.
कुऱ्हाडीच्या जान्या-तिम्या या बंधूंच्या बलिदानाची आठवण म्हणून तिथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पण दुर्दैव म्हणजे या बंधूंनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास आज त्या परिसरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही माहीत नसावा. जान्या-तिम्या स्मारकाचे तर छतही उडाले आहे. पण त्याची ना प्रशासनाला पर्वा आहे ना लोकप्रतिनिधींना. अशा परिस्थितीत आॅगस्ट क्रांतीदिनाची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात आहे.
गोंदियातील सुभाष गार्डनमध्ये भोला अनंतराम किराड यांचे स्मारक आहे. जिल्ह्यातील इतर दोन हुतात्मा स्मारकांच्या तुलनेत या स्मारकाची अवस्था चांगली आहे. पण स्मारकाच्या केवळ समोरील बाजुची देखरेख ठेवली जाते. बाकी बाजुने कमरेएवढे गवत वाढलेले आहे. आॅगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येलाही ते गवत कापण्यात आले नाही, यावरून त्या स्मारकाच्या देखभालीसाठी नगर परिषद किती गंभीर आहे याची कल्पना येते. या स्मारकात आता सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोसह श्रीरामाचे दोन फोटोही लागले आहेत. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ धार्मिक सत्संग होत असल्याचे गार्डनच्या कर्मचाऱ्याने सांगितले. पण स्मारकाच्या भोवती साफसफाई करण्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नाही.