गोंदिया: सडक-अर्जुनी तालुक्याच्या खजरी शेतशिवारात सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या खून प्रकरणाचा थरारक उलगडा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. केवळ खूनच नव्हे तर मृत महिलेच्या सात महिन्याच्या मुलाची विक्री करण्यामागील टोळीचा भांडाफोड करीत सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
३ ऑगस्ट रोजी खजरी शेतशिवारात २०-२५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. इंद्रराज राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली. ती अन्नु नरेश ठाकुर (२१) रा. भिलाई, दुर्ग, छत्तीसगड असल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपी अभिषेक सिद्धार्थ तुरकर (३६) रा. भिलाई, ह.मु. डोंगरुटोला गोरेगाव, गोंदिया हा अन्नुशी अनैतिक संबंधात होता. मोठ्या कर्जामुळे पैशांच्या गरजेतून त्याने पत्नी पूनम तुरकर, नातेवाईक प्रिया तुरकर आणि साथीदार चांदणी रा. नेहरू नगर, भिलाई यांच्या मदतीने कट रचला. २ ऑगस्ट रोजी अभिषेकने अन्नुला खजरी शेतशिवारात नेऊन चाकूने हत्या केली. नंतर तिच्या सात महिन्याच्या मुलगा धनराज याचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून मुलाची विक्री करण्यात आली. या प्रकणातील सातही आरोपींना २२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आले. आरोपी अभिषेक सिद्धार्थ तुरकर, पूनम तुरकर, प्रिया तुरकर, सुरेखा रमेश चौहान, प्रिती कडबे, भावेष अशोक बन्सोड, कमल यादव या सात जणांना अटक केली आहे. त्या आरोपींना पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गोंदियातील लोकांनी घेतले मूलआरोपींनी सुरेखा रमेश चौहान, रा. गड्डाटोली, गोंदिया, प्रिती विकास कडबे, रा. कस्तुरबा वार्ड, कचरा मोहल्ला, गोंदिया, भावेष अशोक बन्सोड, रा. मनोहर कॉलनी, रामनगर, गोंदिया, कमल सुकलाल यादव, रा. गड्डाटोली, गोंदिया यांच्या मुलाला विक्रीचा सौदा करून मुल विक्री केला.
यांनी केली कारवाई कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज राजुरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, शरद सेदाने, सहाय्यक फौजदार राजेंद्र मिश्रा, पोलीस हवालदार सुजित हलमारे, संजय चव्हाण, महेश मेहर, सोमेंद्रसिग तुरकर, दिक्षीतकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, दुर्गेश तिवारी, तुलसीदास लुटे, भुवनलाल देशमुख, भोजराज बहेकार, विठ्ठलप्रसाद ठाकरे, राजकुमार खोटेले, रियाज शेख, पोलीस शिपाई छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, संतोष केदार, राकेश इंदुरकर, सुनिल डहाके, राहुल पिंगळे, दुर्गेश पाटील, स्मिता तोंडरे, कुमुद येरणे, रोशन येरणे, योगेश रहिले, अश्विन वंजारी, लक्ष्मण बंजार, मुरली पांडे, घनश्याम कुंभलवार, राम खंडारे, तांत्रिक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल दुरशेरवार, पोलीस हवालदार रितेश लिल्हारे, रवि शहारे, राजु डोंगरे, कल्पेश चव्हाण यांनी केली आहे.