नागद्वार मंदिरालगत तीन नागराजांचे वास्तव्य
By Admin | Updated: August 15, 2015 01:55 IST2015-08-15T01:55:11+5:302015-08-15T01:55:11+5:30
येथून १० किमी अंतरावर खडकी (डोंगरगाव) येथील नागद्वार मंदिर आंबेतलावच्या पहाडीवर मंदिराला लागून असलेल्या परिसरात गेल्या १५ वर्षापासून साक्षात तीन नागराज वावरत असतात.

नागद्वार मंदिरालगत तीन नागराजांचे वास्तव्य
१५ वर्षापासून एकाच स्थळी : साक्षात दर्शन घेतले जावू शकतात; नागपंचमीला होते पूजन
काचेवानी : येथून १० किमी अंतरावर खडकी (डोंगरगाव) येथील नागद्वार मंदिर आंबेतलावच्या पहाडीवर मंदिराला लागून असलेल्या परिसरात गेल्या १५ वर्षापासून साक्षात तीन नागराज वावरत असतात. मे आणि जून दोन महिने सोडून पूर्ण वर्षभर याच स्थळी त्यांना पाहिले जावू शकते. १५ वर्षापासून ते नागराज त्याच आकाराचे दिसत असून यांच्याशी छेडखाणी करणाऱ्यांना त्वरित दंड मिळाल्याचे खडकी (डोंगरगाव) येथील नागरिकांनी लोकमतला सांगितले.
खडकी (डोंगरगाव) येथील नागद्वार मंदिरात भगवान शिव यांची मूर्ती स्थापित केली आहे. मंदिर तयार करण्यापूर्वी या ठिकाणी बैलांचा पट (शंकटपट) भरविला जात होता. अचानक एक बैल आजारी पडला, तेव्हा शंकराला विनवनी करण्यात आली व तो त्याच वेळी सुधारला. त्यामुळे त्यांनी मंदिर बनविण्याचे ठरवले.
मंदिर बनण्याच्या पूर्वी या ठिकाणी जनावरे चारण्याकरिता गुराखी येत असत. त्यांना एकाच ठिकाणी तीन नागदेवता वावरत असल्याचे दिसत. त्यांनी ते गावकऱ्यांना सांगितले. सन १९९९ मध्ये गावकऱ्यांनी वास्तविकता तपासून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खरच त्या ठिकाणी एकाच आकाराचे तीन नागराज दिसू लागले. तेव्हापासून त्यांची पूजा-अर्चना करणे, त्यांचे दर्शन घेणे, नागपंचमीला जोरात पूजापाठ करण्याचे प्रकार सुरू झाले.
या स्थळाची वास्तविकता जाणून घेण्याकरिता या क्षेत्राचे कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी, मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले आणि नेतराम माने यांनी जावून गावच्या प्रतिष्ठित व प्रमुख व्यक्तींना बोलावून सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या ठिकाणी मंदिराच्या बाजूला खळाच्या फटीत एकाच आकाराचे तीन (मध्यम छोट्या आकाराचे) नाग प्रत्यक्ष दिसून आले.
या वेळी खडकी येथील दिनेश पटले, श्यामराव, राघोबा कटरे, हौशीलाल पटले, रविंद्र कटरे, सीताराम कटरे आणि डॉ. फाल्गून कटरे उपस्थित होते.
या नागराजांची विशेषता विचारल्यावर उपस्थितांनी सांगितले की, येथील नागराज अनेकवेळा मंदिरातील दानपेटीवर किंवा दानपेटीच्या आत आढळून येतात. १५ वर्षापूर्वीपासून ज्या आकाराचे हे नागराज दिसत होते त्याच आकाराचे आजही दिसत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जुलै महिन्यापासून एकाचस्थळी नागराज
गुराख्यांकडून सन १९९९ मध्ये माहिती मिळाल्यानंतर, तेव्हापासून सतत हे तीन नागराज याच ठिकाणी आपला वास्तव्य करीत आहेत. उन्हाळ्यात मे आणि जून या दोन महिन्यात ते भटकताना दिसतात. परंतु जुलै महिना लागला की, पुन्हा याच स्थळी येतात, असे वयोवृद्ध श्यामराव कटरे, राघोबा कटरे आणि नागमंदिर विकास समितीचे कार्यकर्ते डॉ. फाल्गुन कटरे यांनी सांगितले.
छेडणाऱ्यांना मिळाला दंड
नागराज असलेल्या ठिकाणाला लागून हौसीलाल पटले यांनी दर्शनार्थ्यांना दान देण्याकरिता दानपेटी ठेवली होती. मात्र एका चोरट्याने ती पळवून नेली. मात्र तो काहीच दिवसात अपंग अवस्थेत गेला. काही एैबी लोकांनी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला, त्यांना स्वप्नात काही दृष्टांन्त दिसून आले तर काहींना त्रास झाला. त्यांनी दया-याचना केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याचे हौसीलाल पटले, राघोबा कटरे, श्यामराव कटरे आणि डॉ. कटरे यांनी सांगितले. दंड मिळाले त्यांचे नाव विचारल्यावर त्यांनी दंड मिळाला असून त्यांची बदनामी केल्यासारखे होईल, नाव जाहीर करणे योग्य होणार नाही, असे सांगितले.