त्या १२ मोटारसायकल कुणाच्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:40 IST2019-03-16T21:39:08+5:302019-03-16T21:40:00+5:30
गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. परंतु पोलिसांनी जप्त केलेल्या २० पैकी ८ मोटारसायकलचे मालक पोलिसांना माहिती झाले.

त्या १२ मोटारसायकल कुणाच्या?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. परंतु पोलिसांनी जप्त केलेल्या २० पैकी ८ मोटारसायकलचे मालक पोलिसांना माहिती झाले. परंतु १२ मोटारसायकलचे मालक कोण हा प्रश्न पोलिसांसमोर आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने १० मार्च रोजी गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम मजीतपूर परिसरात ८ जणांना पकडले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ २० मोटारसायकल आढळल्या. जप्त केलेल्या २० मोटारसायकल पैकी ८ मोटारसायकलचे गुन्हे तिरोडा, गोंदिया शहर, रावणवाडी, गोंदिया ग्रामीण व रामनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. परंतु जप्त करण्यात आलेल्या त्या १२ मोटारसायकल कुणाच्या आहेत याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. ज्या लोकांचे वाहन चोरीला गेले त्यांनी पोलिसात तक्रारच दिली नाही. त्यामुळे मिळालेली वाहने कुणाची याची माहिती पोलिसांनाही मिळू शकली नाही.
जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलची किंमत ९ लाख ६५ हजार रूपये आहे.
मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. वर्ष दीड वर्षात शेकडो मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. परंतु यासंदर्भात कमी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी ६ दिवसांपासून पीसीआरमध्ये
१० मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. आरोपी शिवम संतोष खरोले (१९), शुभम रमेश पटले (२०), जितेंद्र सेवकराम साकोरे (२२रा. मजीतपूर), सलाम रफीक शेख (२०), राहूल रविंद्र मस्करे (२०),राकेश रामदास मडावी (२७), प्रवीण उर्फ छोटू गणेश बिसेन (२५) व गणेश प्रल्हाद मेश्राम (२०,रा. गंगाझरी) यांना न्यायालयाने सुरूवातीला १३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर १६ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शनिवारी सायंकाळी त्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या भीतीपोटी तक्रार देत नाहीत
ज्यांचे वाहन चोरीला गेले ते लोक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांच्याशी डायरी अमलदाराची असलेली वागणूक हिन दर्जाची राहात असल्यामुळे अनेक लोक पोलीसांकडे तक्रार करीत नाही. वाहन चोरीला गेल्यावर तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचलेल्या वाहन मालकाला एक ना अनेक प्रश्न करीत जणू त्यानेच अपराध केला असे वर्तन पोलिसांकडून होत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे अनेक लोक मोटारसायकल चोरी झाल्याचे नुकसान सहन करतात परंतु तक्रार देत नाही. आपल्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची वाढ दिसू नये यासाठी पोलीसही गुन्हे दाखल करून घेत नाही. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.