चोरटा हेरला, तीन दुचाकी ताब्यात घेतल्या; रामनगर पोलिसांची कारवाई

By नरेश रहिले | Published: March 9, 2024 08:10 PM2024-03-09T20:10:36+5:302024-03-09T20:15:01+5:30

एक लाख रुपयांचा माल जप्त

Thieves spied, three bikes seized; Action of Ramnagar Police | चोरटा हेरला, तीन दुचाकी ताब्यात घेतल्या; रामनगर पोलिसांची कारवाई

चोरटा हेरला, तीन दुचाकी ताब्यात घेतल्या; रामनगर पोलिसांची कारवाई

गोंदिया : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असताना चोरट्यांवर करडी नजर ठेवून बसलेल्या पोलिसांनी एकाच आरोपीकडून चोरी केलेल्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई रामनगर पोलिसांनी शनिवारी (दि.९) केली.

लगतच्या ग्राम कुडवा येथील रहिवासी दिव्यांश रंगलाल लिल्हारे यांनी ६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता आपली मोटारसायकल (क्र. एमएच ३५ एके ८१७६) रेलटोली परिसरातील आयुष हॉस्पिटलसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांनी रामनगरचे ठाणेदार संदेश केंजळे व डी. बी. पथकाला प्रकरणाचा तपास करून चोरट्याला पकडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली सूत्रे हलवून माहितीच्या आधारे आरोपी दुर्गेश देवकरण भगत (२४, रा. कटंगीटोला) याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता दुर्गेशने गुन्हा कबूल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक उमेश माळी, सहायक फौजदार राजेश भुरे, नामदेव बनकर, हवालदार छत्रपाल फुलबांधे, सुनीलसिंह चौहाण, बाळकृष्ण राऊत, कपिल नागपुरे, चालक पवार यांनी केली आहे.

चोरलेल्या तीन मोटारसायकली केल्या जप्त

प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गुप्त माहितीदारांना कामावर लावले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुर्गेश भगत याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने केलेल्या विचारपूस नंतर दुर्गेशने चोरी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, त्याच्याकडे पोलिसांना मोटारसायकल (क्र. एमएच ३५ एके ८१७६) किंमत ३० हजार रुपये, मोटारसायकल (क्र. एमएच ३५ एडी १२०५) किंमत ३० हजार रुपये व मोटारसायकल (क्र. एमएच ३५ एएफ १३११) किंमत ४० हजार रुपये अशा एक लाख रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली मिळून आल्या. पोलिसांनी दुर्गेशला अटक केली असून, तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

Web Title: Thieves spied, three bikes seized; Action of Ramnagar Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.