गोंदिया जिल्ह्यातील 'हे' १६ ब्लॅक स्पॉट ठरू शकतात जीवघेणे ! इथे ९ महिन्यांत झाले १३४ जणांचे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:56 IST2025-10-14T17:55:08+5:302025-10-14T17:56:28+5:30
जिल्ह्यात २५५ अपघात घडले : १२३ गंभीर तर ४९ किरकोळ जखमी

'These' 16 black spots in Gondia district can be fatal! 134 people died here in 9 months
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील ९ महिन्यांत २५५ अपघात घडले असून, या अपघातात १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. १२३ जण गंभीर जखमी झाले असून ४९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जलद गतीने वाहन चालविणे, वाहतूक नियमांना बगल देत वाहन चालविणे यातून अपघात घडत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १६ ब्लॅक स्पॉटवर यमराज बसला आहे. त्यासाठी वाहने हळू चालवा असा सल्ला जिल्हा वाहतूक पोलीस देत आहेत.
रस्ते रुंद झाल्याने महामार्गावरील वाहनांची गतीही वाढली आहे. अशात सुरक्षा साधनांचा वापर करूनच प्रवास करणे अपेक्षित आहे. मोटार कंपनीने कितीही सुरक्षिततेची तजवीज वाहनात केली असली तरी त्याचा वापर करणे आवश्यक आहे. कारमध्ये बसले असताना सीट बेल्ट आवश्यक आहे. बऱ्याचदा सीट बेल्टशिवाय एअर बॅगही उघडत नाही. स्वतःचा जीव वाचविण्याकरिता वापर करणे आवश्यक आहे. तशी सवय लावून घेणे फायद्याचे आहे, अन्यथा जीव जाऊ शकतो. महागडी गाडी घेऊनही जिवाची सुरक्षा होत नसेल तर महागडी गाडी घेण्याचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित होत आहे.
सीट बेल्ट लावला नाही तर दंडात्मक कारवाई होते. सुरुवातीला ५०० रुपये दंड होतो. दुसऱ्यांदा आढळल्यास हजार रुपये दंड आकारला जातो. दंडाच्या भीतीने सीटबेल्ट लावण्यापेक्षा जीव वाचविण्यासाठी सीटबेल्ट लावण्याची सवय लावणे केव्हाही चांगले आहे.
हे आहेत १६ ब्लॅक स्पॉट
जिल्ह्यात एकूण १६ ब्लॉक स्पॉट आहेत. यात डुग्गीपारचा डव्वा, कोहमारा टी पाईट, परसोडी/खजरी, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत मुंडीकोटा, अदानी पॉवर प्लांट, बिरसीफाटा, गोंदिया ग्रामीण ठाण्यांतर्गत फुलचूर आयटीआय, नागरा बसस्टॉप, कारंजा बसस्टॉप, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत डोंगरगाव डेपो, देवरी नाला, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत भागवतटोला शिवार, कटंगीकला शिवार, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत रावणवाडी बसस्टॉप, कोरणी नाका व सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत साखरीटोला हे ब्लॅक स्पॉट आहेत.
अपघातातील मृतक व जखमी महिनानिहाय
महिना एकूण अपघात मृतक जखमी
जानेवारी ३६ १८ १७
फेब्रुवारी ३२ २२ १५
मार्च २४ १२ १५
एप्रिल ३२ १२ २९
मे ३४ १७ २४
जून २५ १३ १६
जुलै २४ १४ १५
ऑगस्ट २८ १३ ३०
सप्टेंबर २० १३ ११
"सीट बेल्टचा नियम सर्वांनीच पाळावा जीवन सुरक्षा प्रणालीत सीट बेल्ट मोडतो. त्याचा वापर न चुकता करणे आवश्यक आहे. बेल्ट नसल्याने जीव गमावलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी सर्वांनी सीट बेल्ट लावावा."
- नागेश भास्कर, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया.
"दंड चुकविण्यासाठी बेल्ट लावल्याचा देखावा आपलीच फसवणूक करणारा आहे. जीवाच्या सुरक्षेपेक्षा मोठे काही नाही. यासाठी सीट बेल्ट प्रत्येकाने लावावे."
- प्रकाश बहेकार, वाहन चालक पदमपूर
"वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. मी गाडी चालविताना सीट बेल्टचा वापर करतो. त्यातून आपलीही सुरक्षा होते."
- गोविंद बहेकार, वाहन चालक पदमपूर