लोकमत न्यूज नेटवर्क दरेकसा : शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत विधवेचे घर जळून राख झाल्याची घटना ग्राम जमाकुडो येथे रविवारी (दि.२०) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. या आगीत घरातील संपूर्ण सामान जळून राख झाल्याने विधवेच्या अंगावर आहेत तेवढे कपडेच उरले आहेत. ग्राम जमाकुडो येथील वॉर्ड क्रमांक-३ मधील रहिवासी फुलकुवरबाई रूपचंद कुराहे यांचे घर असून, रविवारी (दि.२०) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घराला अचानक आग लागली. सुदैवाने याप्रसंगी त्या घरी नव्हत्या व गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही व आगीत संपूर्ण घर त्यातील धान्य, कपडे व अन्य सामान जळून राख झाले. यामध्ये फुलकुवरबाईंचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या अंगावर आहेत तेवढेच कपडे शिल्लक असून, राहण्याची व खाण्याचीही सोय नाही. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचे समजते. अशात शासनाने त्यांच्या राहण्यासाठी घर व झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी फुलकुवरबाई व गावकऱ्यांनी केली आहे.