गोंदिया येथील प्रयोगशाळेत ६० स्वॅब नमुन्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:00:43+5:30
आतापर्यंत गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरसह थेट नाशिक व मालेगाव येथील नमुने नागपूर येथील लॅबमध्ये पाठविले जात होते. यामुळे नागपूरच्या प्रयोगशाळेवर प्रचंड ताण येत होता. कोरोनाचा उद्रेक बघता मोठ्या संख्येत नमुने तपासणीसाठी येत असल्याने नागपूरच्या लॅबमधून अहवाल प्राप्त होण्यासाठी उशीरही लागत होता.

गोंदिया येथील प्रयोगशाळेत ६० स्वॅब नमुन्यांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुमारे महिनाभरापूर्वी मिळालेल्या मंजुरीनंतर येथील कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने प्रयोगशाळा आता सुरू झाली आहे.सोमवारपासून (दि.८) येथील लॅबमध्ये स्वॅब नमुन्यांची तपासणी सुरू झाली असून आतापर्यंत घेण्यात आलेल्या ६० नमुन्यांपैकी ३ नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल या प्रयोगशाळेने दिला आहे.
आतापर्यंत गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरसह थेट नाशिक व मालेगाव येथील नमुने नागपूर येथील लॅबमध्ये पाठविले जात होते. यामुळे नागपूरच्या प्रयोगशाळेवर प्रचंड ताण येत होता. कोरोनाचा उद्रेक बघता मोठ्या संख्येत नमुने तपासणीसाठी येत असल्याने नागपूरच्या लॅबमधून अहवाल प्राप्त होण्यासाठी उशीरही लागत होता.
अशात नागपूर येथील प्रयोगशाळेवरील ताण कमी व्हावा व नमुन्यांचा अहवाल त्वरीत मिळावा यासाठी राज्य आरोग्य विभागाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा मंजूर केली होती. सोमवारी (दि.८) येथील लॅबमध्ये नमुन्यांची तपासणी करण्यास सुरूवात झाली.
विशेष म्हणजे, आतापर्यंत येथील लॅबमध्ये ६० नमुन्याची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.म्हणजेच, कोरोनामुक्त झाल्यानंतर आता नव्याने मिळून आलेल्या ३ रूग्णांचा अहवाल येथील लॅबनेच पॉझिटिव्ह दिला आहे. विशेष म्हणजे, येथील लॅब सुरू झाल्याने आता नागपूर येथे नमुने पाठविण्याची गरज नसून त्यांचा अहवालही लगेच मिळणार आहे.
१० जणांचे विशेष पथक
येथील लॅबमध्ये टेस्टींगसाठी १० जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून ते शिफ्टनुसार कार्य करीत आहेत. यामध्ये १ मायक्रोबायोलॉजी प्रोफेसर, ३ असिस्टंट प्रोफेसर व ६ टेक्नीशीयन आहेत. लॅबमध्ये टेस्टींगचे काम २४ तास सुरू राहत असल्याने त्यांना शिफ्टनुसार काम करावे लागत आहे. विशेष म्हणजे, येथील मशीनची १२० नमुने तपासणीची क्षमता असल्याने अद्याप तरी तेवढा ताण येथील लॅबवर पडत नाही.
शेजारील जिल्ह्यातील नमुने नाहीच
येथील लॅब सुरू झाल्यानंतर लगतच्या भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी मदत होणार असे वाटत होते. मात्र अद्याप या जिल्ह्यांतील नमुने येथील लॅबमध्ये आले नाहीत. कारण भंडारा जिल्ह्याला नागपूर जवळ पडते. तर गडचिरोली जिल्ह्यातील नमुने चंद्रपूर येथील लॅबमध्ये जात आहेत. मात्र गरज पडल्यास व तेथील नमुने येथील लॅबमध्ये आल्यास तशी सोय करता येणार आहे.