दहा वर्षाचा मुलगा हाकतोय कुटुंबाचा गाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:00:45+5:30
वास्तविक आयुष्यात असे अबोल चित्र पहायला मिळाले तर काय बोलावे आणि काय करावे हे कळायला मार्ग नसतो. शहरातील एक दहा वर्षाचा शाळकरी मुलगा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गाडा पुढे नेण्यासाठी भाजीपाला विकतो. दारोदारी फिरून दोन पैसे कमविण्यासाठी रक्ताचे पाणी करतो. त्याची जिद्द चिकाटी आणि कामाप्रती असलेली अफाट श्रध्दा चांगल्या चांगल्याना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे.

दहा वर्षाचा मुलगा हाकतोय कुटुंबाचा गाडा
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : कोरोनाने आयुष्याची बेरीज वजाबाकी शिकविली. जगण्यातले संदर्भही बदलले. अनेकांना खूप काही गमवावे लागले. ज्यांनी गमविले ते परत मिळविता येईल. पण जे एकदा गेले की मिळविता येत नाही. असे बालपण एक दहा वर्षाचा शाळकरी विद्यार्थी उंबरठ्यावर असलेला हरवित असेल तर या देशाच्या लोकशाहीला झापड लावण्यासारखे आहे. त्याचे बालपण वाचवा ही आर्त हाक समाजमाध्यमातून पुढे येईल का हा प्रश्न आहे.
हे वास्तव एखाद्या कथेला शोभणारे आहे. हे वास्तव चित्रपटात पाहयला मिळते. मात्र ते सर्व मनोरजंनापुरतेच मर्यादित असतात. वास्तविक आयुष्यात असे अबोल चित्र पहायला मिळाले तर काय बोलावे आणि काय करावे हे कळायला मार्ग नसतो. शहरातील एक दहा वर्षाचा शाळकरी मुलगा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गाडा पुढे नेण्यासाठी भाजीपाला विकतो. दारोदारी फिरून दोन पैसे कमविण्यासाठी रक्ताचे पाणी करतो. त्याची जिद्द चिकाटी आणि कामाप्रती असलेली अफाट श्रध्दा चांगल्या चांगल्याना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. पण एक दहा वर्षाचा शाळकरी मुलगा एवढ्या लहान वयात कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गाडा हाकत असेल तर त्याच्या दुंभगलेल्या बालपणाचे काय? त्याच्या बालपणाची खरी जबाबदारी कोणाची? बालपणात एवढे कष्ट करुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एका निरागस बालकाला एवढे झटावे लागत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकेल. महेश रामलाल नागरीकर असे त्या वर्षीय मुलाचे नाव. स्थानिक शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल येथील तो विद्यार्थी आहे.
कोरोनामुळे शाळेला सुटी असल्याने महेश घरोघरी जाऊन भाजीपाला विकण्याचे काम करतो. कसेबसे भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावत आहे. वडील रामलाल नागरीकर दहा वर्षापुर्वी विद्युत खांबावरून पडल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आले. आई अंगणवाडीत मदतनीसाचे काम करते. पण तिला कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तीन महिन्यापासून मानधन मिळालेले नाही.
रामलालला औषधीसाठी महिन्याकाठी दोन ते तीन हजार रुपये लागतात. अशावेळी पोटासाठी झगडावे कसे आणि आयुष्याचे चक्र पुढे चालू ठेवावे कसे. या धीरगंभीर प्रश्नाभोवतीच रामलालचे अवघे कुटुुंब गुरफटलेले आहे.
अशावेळी कुटुंबातील दहा वर्षाचा मुलगा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुढे यावा, ही घटनाच मन अस्वस्थ करणारी आहे. ज्या वयात आशावाद उराशी बाळगून स्वप्न फुलवायचे, ज्या वयात आईवडीलांच्या अंगावर खेळून बालपणाचे हट्ट त्यांच्याकडून पुरवून घ्यायचे.
त्या वयात कुणी कुटुंबाचा गाडा हाकत असेल तर त्याच्या बालपणाला सलाम ठोकलाच पाहीजे. महेश मागील दोन महिन्यांपासून भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावत आहे. अवघ्या दहा वर्षाच्या मुलाला या गजबजलेल्या दुनियेत भाजीपाला विकता येत असेल, दोन पैसे कमविता येत असेल तर धन्य तो मुलगा आणि धन्य त्याचे आईवडील.
गोरेगाव दानवीरांचे शहर
गोरेगाव शहर पिढीजात दानविराचे शहर आहे. इथे परराज्यातील लोकांना मदतीसाठी धावणारी माणसे आहेत. दहा वर्षाचा चिमुकला महेश इथल्याच मातीत जन्मलेला. अशावेळी त्याच्या कुटुंबाला हातभार लावणारे पुढे येतील का? हा खरा प्रश्न आहे.
ठेला बनवायला नव्हते पैसे
पैसे कमविणे तेवढे सोपे नाही. यासाठी बरीच मेहनत करावी लागते. व्यवसाय करताना प्रथम लागत लावावी लागते पण त्यासाठीही पैसे नसतील तर फारच कठीण होऊन जाते. पोटाचा प्रश्न जेव्हा सतावतो तेव्हा डोकं चालत नाही. जगावे कसे हा प्रश्न आवासून उभा राहील्यावर कुणी मदतीसाठीही धावत नाही. या सर्व परिस्थितीवर मात करून रामलालने चार चाक आणि खाटेचा वापर करून ठेला बनविला खरा पण त्या ठेल्याची स्टेरिंग ज्या हातात दिले ते हात मात्र नाजूक आहेत.