दहावीच्या अभ्यासक्रमावरून शिक्षक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:36+5:302021-01-13T05:15:36+5:30
गोंदिया : पहिली ते दहावीच्या सत्राची दिनदर्शिका शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध करून त्यात वगळलेले विषयसुद्धा समाविष्ट केले आहेत. ...

दहावीच्या अभ्यासक्रमावरून शिक्षक संभ्रमात
गोंदिया : पहिली ते दहावीच्या सत्राची दिनदर्शिका शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध करून त्यात वगळलेले विषयसुद्धा समाविष्ट केले आहेत. दहावीचा अभ्यासक्रम वेळेत म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे दिसल्याने शिक्षकांत संभ्रम आहे.
दहावीच्या बहुतेक विषयांचे अध्यपन फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण करून मार्च महिन्यात वर्षभरातील विषयाची उजळणी करण्याचे दिनदर्शिकेतील नियोजनात दाखविले आहे. शाळांनी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचेही नियोजनात दर्शविले आहे, पण अनेक शाळांनी ऑनलाईन वर्गात अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यात यावर्षी उन्हाळी सुटीही देण्यात आली नव्हती. दहावीच्या अभ्यासक्रमातील काही पाठ वगळण्यात आले होते, तर काही पाठांचा भारांश कमी करण्यात आला होता. मात्र, शिक्षण विभागाने दिलेल्या दिनदर्शिकेत वगळलेल्या पाठांचाही समावेश करण्यात आला आहे. भाषा विभागातील वगळलेले घटकही दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आले असल्याने शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण आहे. नववी ते बारावीचे काही वर्ग काही शाळांत सुरू झाले असले तरी पालकांची संमती घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे ही अट टाकण्यात आल्याने १०० टक्के वर्ग सुरू झाले नाहीत. दररोजच्या तासिकांही मर्यादित करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन भरणाऱ्या या वर्गाचे किंवा प्रत्यक्षात सुरू झालेल्या वर्गाचे या सत्राचे नियोजन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केले आहे.