नागपुरातून चोरी झालेला टँकर नवेगावबांध येथे सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST2020-12-11T05:00:00+5:302020-12-11T05:00:04+5:30
स्टेशन डायरी ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदार साबीर शेख यांनी ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांना याबद्दल त्वरित माहिती दिली. त्यांनी टँकरचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार साबीर शेख, अनंत तुलावी, पोलीस शिपाई दीपक कराड, चालक सहाय्यक फौजदार सयाम यांचे पथक तयार करून त्यांना रवाना केले. त्यानुसार, पथक टँकरचा शोध घेत असताना नवेगावबांध-गोठणगाव मार्गावर गोठणगावच्या दिशेने जाताना टँकर दिसला असता चालकास वाहन थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला.

नागपुरातून चोरी झालेला टँकर नवेगावबांध येथे सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : नागपूर येथील कपिल नगर पोलीस ठाण्यात चोरीची नोंद असलेला टँकर येथील पलटूदेव पहाडी परिसरातून नवेगावबांध पोलिसांनी ताब्यात घेतला. गुरूवारी (दि.१०) ही कारवाई करण्यात आली असून चालक पोलिसांना बघून जंगलात पसार झाला.
प्राप्त माहितीनुसार गुरूवारी (दि.१०) नवेगावबांध पोलीस ठाण्यात नागपूर येथील राजू शिवहरे नामक व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून नागपूर येथे अज्ञात इसमाने चोरून नेलेला टँकर क्रमांक एमएच ४६- बीएम २३१२ नवेगावबांध परिसरात असल्याचे जीपीएसद्वारा दिसत असल्याची माहिती सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दिली.
स्टेशन डायरी ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदार साबीर शेख यांनी ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांना याबद्दल त्वरित माहिती दिली. त्यांनी टँकरचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार साबीर शेख, अनंत तुलावी, पोलीस शिपाई दीपक कराड, चालक सहाय्यक फौजदार सयाम यांचे पथक तयार करून त्यांना रवाना केले. त्यानुसार, पथक टँकरचा शोध घेत असताना नवेगावबांध-गोठणगाव मार्गावर गोठणगावच्या दिशेने जाताना टँकर दिसला असता चालकास वाहन थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला.
परंतु टँकर न थांबविता चालक वेगाने गोठणगावच्या दिशेने निघाला. तसेच पोलीस आपल्या मागावर आहेत हे लक्षात येताच पलटूदेव पहाडी समोर टँकर चालू स्थितीत सोडून लगतच्या जंगलात पळ काढला. जंगल परिसर दाट असल्याने त्याचा शोध लागला नाही. मात्र पथकाने पंचांसमक्ष टँकरच्या कॅबिनची पाहणी केली असता चालकाच्या सीटजवळ जानिकराम चौधरी (रा.चित्तेगाव, चिखली, चंद्रपूर) या इसमाचे आधारकार्ड मिळाले. टँकरचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून टँकरमध्ये मिळालेले आधारकार्ड ताब्यात घेऊन टँकर पुढील कारवाई करिता येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.