प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या

By Admin | Updated: July 11, 2016 01:47 IST2016-07-11T01:47:40+5:302016-07-11T01:47:40+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम सन २०१६-१७ करिता लागू करण्यात आली आहे.

Take advantage of the Prime Minister's Crop Insurance Scheme | प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या

मुदत ३१ जुलैपर्यंत : शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहणार
गोंदिया : प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम सन २०१६-१७ करिता लागू करण्यात आली आहे. पीक विम्यासाठी हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून या योजनेचा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान तसेच सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे व कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एच्छिक आहे. खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेस पात्र आहेत.
या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांना सदर पीक विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामाकरिता २ टक्के, रबी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. जोखमीच्या बाबींची व्याप्ती या योजनेंतर्गत वाढविण्यात आली आहे. यामध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचा उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणीला त्या पिकांचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केला जाईल.
हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामुळे हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकातील उत्पन्नात येणारी घट व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, अशी या योजनेची प्रमुख वैशिष्टै आहेत. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एच्छिक आहे.
या योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०१६ मध्ये तृणधान्य भात हे पीक या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. भात या पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम प्रतिहेक्टरी ३९ हजार रूपये इतकी असून शेतकऱ्यांना ७८० रूपये पीक विमा हप्ता भरावयाचा आहे.
तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Take advantage of the Prime Minister's Crop Insurance Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.