तहसील कार्यालय झाले स्वच्छ
By Admin | Updated: October 26, 2015 01:52 IST2015-10-26T01:52:47+5:302015-10-26T01:52:47+5:30
स्थानिक तहसील कार्यालयाला घाणीचा विळखा, सर्वत्र दुर्गंध व सार्वजनिक आरोग्य धोक्यात, अशा आशयाची बातमी लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आली होती.

तहसील कार्यालय झाले स्वच्छ
प्रत्यक्ष पाहणीत सत्य उजागर : आमदारांनी घेतली लोकमतच्या वृत्ताची दखल
तिरोडा : स्थानिक तहसील कार्यालयाला घाणीचा विळखा, सर्वत्र दुर्गंध व सार्वजनिक आरोग्य धोक्यात, अशा आशयाची बातमी लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची आमदारांनी दखल घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून तहसील कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आले.
स्थानिक तहसील कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य असून तहसीलला घाणीचा विळखा, सर्वत्र दुर्गंधी, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा शासकीय कार्यालयात फज्जा, विविध नागरिकांना जात व उत्पन्नाच्या दाखल्यांकरिता तहसील कार्यालयाचे चकरा माराव्या लागतात, या आशयाची बातमी लोकमतला प्रकाशित झाली. त्यामुळे प्रशासनाला जाग आली. तहसीलदाराने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावले असल्याचे समजते. त्यामुळे तहसील कार्यालय परिसर आता स्वच्छ झाले आहे. तर आ. विजय रहांगडाले यांनी चक्क या लोकमतच्या बातमीचा संदर्भ टाकून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे पत्र जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले.
आ. विजय रहांगडाले यांनी या संदर्भात १५ आॅक्टोबरला लोकमत वर्तमानपत्रातील बातमीचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला शासकीय कार्यालयातच फज्जा उडाल्याचे निदर्शनात येत आहे, असे विषयात नमूद केले आहे.
पुढे त्यांनी पत्रात नमूद केले की, तिरोडा तहसील कार्यालय परिसरात दुर्गंध व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्ष पाहणी केली असता ही सत्य स्थिती आढळून आली. तसेच शासनाने गुटखा बंदी केली असूनसुद्धा शासकीय कर्मचारीच गुटखा खाऊन कार्यालयात घाण करीत असल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा दबाव नसल्याने कित्येक कर्मचारी हे पानटपरीवर आढळून येतात.
नागरिकांना विविध कामासाठी जसे उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर, रेशन कार्ड इत्यादीकरिता तहसील कार्यालयाचे वारंवार चकरा माराव्या लागतात. कित्येक प्रकरणे प्रलंबित असून याबाबत नागरिकांनी तक्रारसुद्धा केली आहे. जसे स्वच्छ भारत अभियानाबाबत शासकीय कार्यालयात उदासिनता आढळून येत आहे तसेच शासनाच्या राईट टू सर्विस एक्ट बद्दल होऊ नये. याकरिता सदर प्रकरणावर गांभीर्याने लक्ष देवून संबंधितांवर कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत कार्यालयास कळवावे, असे नमूद आहे.
आ. विजय रहांगडाले यांच्या सदर पत्रावर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे तहसीलदार तिरोडा यांच्यावर कोणती कारवाई करतात, याकडे तालुक्यातील सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)