३१२ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:35+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत. यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात ३१ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.

३१२ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३२८ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३१२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेला नाही. विशेष म्हणजे मागील ३१ दिवसात जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत. यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात ३१ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
काही व्यक्ती घरी तर काही व्यक्तींना शासकीय संस्थांत्मक अलगीकरण तर काहींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नियमित नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी १६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
६३ जण आयसोलेशन कक्षात
गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात सध्या ६३ जण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर जिल्ह्यातील सहा क्वारंटाईन कक्षात ६१ जण उपचार घेत आहेत. शासकीय क्वारंटाईन कक्षात एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज कुडवा गोंदिया १७, चांदोरी ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा २, शासकीय आश्रमशाळा इळदा २६ आणि बिरसी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ७ अशा एकूण ६१ व्यक्ती उपचार घेत आहे.