निसर्गाशी आत्मघाती थट्टा सुरूच

By Admin | Updated: August 1, 2014 00:20 IST2014-08-01T00:20:59+5:302014-08-01T00:20:59+5:30

मागील दोन दशकाच्या कालावधीत शेकडो पर्यटकांचा बळी घेऊन सुद्धा तालुक्यातील हाजराफॉल पर्यटन स्थळ दिवसेंदिवस दूर-दूरच्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या

Suicidal Suspicions of Nature | निसर्गाशी आत्मघाती थट्टा सुरूच

निसर्गाशी आत्मघाती थट्टा सुरूच

हाजराफॉल : बेलगाम पर्यटक, शासनाकडून अद्याप उपाययोजना नाहीत
विजय मानकर - सालेकसा
मागील दोन दशकाच्या कालावधीत शेकडो पर्यटकांचा बळी घेऊन सुद्धा तालुक्यातील हाजराफॉल पर्यटन स्थळ दिवसेंदिवस दूर-दूरच्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु त्याच बरोबर येथे शासनाचे दुर्लक्ष व बेलगाम पर्यटक नेहमी येत असून येथे निसर्गाशी आत्मघाती थट्टा करीत असतात. मौज मस्तीच्या नावावर निसर्गाशी खेळण्याचा प्रकार सतत सुरूच असल्यामुळे आता हाजराफॉल आणखी किती पर्यटकांचा बळी घेणार आणि प्रशासन केव्हा जागे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा मुख्यालयापासून ५२ कि.मी. व सालेकसा तालुका मुख्यालयापासून १० कि.मी. अंतरावर असलेले हाजराफॉल (धबधबा) सतपुडा पर्वत रांगेच्या पूर्वी श्रृंखलेत दरेकसा पर्वत रांगेत स्थित आहे. घनदाट जंगल परिसर, शेकडो किलो मिटर पर्वत रांग यांच्या सानिध्यात वर्षानुवर्षे डौलाने उभे असलेले मोठमोठे वृक्ष व मुक्त विचरण करणारे विविध जातीचे तृणभक्षी व मांस भक्षी प्राणी अशी या हाजराफॉल परिसराची विशेषता आहे. वायु प्रदुषण व जलप्रदुषण यापासून दूर असलेला परिसर असून येथे भरपूर आॅक्सिजन प्राप्त होते. त्यातच उंच पहाडावरुन खाली पडणारा तीन नाल्यांचे पाणी व त्यातून निर्माण होणारे कारंजे मानवाला आकर्षित केल्या शिवाय राहत नाही. प्रत्येक स्त्री पुरुषांच्या मनाला आल्हादित करुन ठेवणारा धबधबा पाहण्यासाठी आता गोंदिया जिल्ह्यासोबतच दूर-दूर वरुन महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशासह इतर राज्यातील पर्यटक सुद्धा हाजरा फॉलला येऊ लागले. त्यामुळे मागील काही वर्षात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परंतु त्याच बरोबर येथे येणारे अनेक युवक-युवती निसर्गाशी थट्टा करीत असल्यामुळे त्यांना आपले प्राणही गमवावे लागले.
यात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांना येथे घडणाऱ्या घटना व धोक्यांबद्दल माहिती नाही. तसेच काही युवक-युवती आपल्या तारुण्याच्या जोशात कुठे धोका आकहे याचाही भान ठेवीत नाही व निसर्गाशी थट्टा करणारी मौज मस्ती करीत असतात. या दरम्यान कोणत्याही दगडावर उभे राहून किंवा खोल पाण्यात जाऊन फोटो काढण्याचे जास्त शौकीन असतात. एकमेकाच्या गळ्यात हात घालून धोक्याच्या ठिकाणी उभे राहून फोटो काढून घेण्यात जास्त रस घेणाऱ्या युवक-युवतींची संख्या खूप जास्त दिसते. परंतु अनावधानाने हे कृत्य त्यांच्या जीवावर बेतल्याशिवाय राहत नाही.
सध्या पावसाळा जोरात असून हाजराफॉल धबधब्यावरुन संततधार पाणी पडत आहे. उंच पहाडावरुन तीन नाल्यांचे पाणी एकत्रित होऊन पडत असल्यामुळे खाली तलावात पाण्याचे मोठमोठे कारंजे निर्माण होत आहे व पाण्याचा धूर उडत आहे. हाजराफॉल परिसरात दूर दूर पर्यंत पाण्याचा धूर उडत असल्यामुुळे पर्यटकांच्या अंगाला त्याचा मऊ स्पर्श रोमहर्षक वाटत आहे. याचा आनंद लुटण्यासाठी रोज शेकडोच्या संख्येत पर्यटकांची रीघ लागलेली दिसत असते. सुटीच्या दिवशी तर हजारोंच्या संख्येत लोक हाजराफॉल बघण्यासाठी येत आहेत. यात काही पर्यटक येथील संभावित धोक्याच्या भान ठेवत सभ्यतेने या पर्यटन स्थळाचा पूरेपूर आनंद घेताना दिसतात. तर काही आपल्या तारुण्याच्या जोशात प्रकृतीशी खेळण्याचा दुस्साहस करीत असताना दिसतात. काल सुटीच्या दिवशी हाजराफॉल येथे भेट दिली असता असे दिसून आले की, या ठिकाणी अनेकांचा बळी गेला असून सुद्धा अनेक मौज मस्तीच्या नावावर जीव घेणे कृत्य करीत होते. वर पहाडावर चढून पाणी पडत असलेल्या ठिकाणी बाजूच्या दगडावर दगडाच्या टोकावर बसून फोटो काढणे, तसेच वरून दगड मारणे असे कृत्य करताना ते दिसले. तर खाली काही युवक बिनधास्त पणे तलावात आंघोळ करण्यासाठी प्रवेश करीत होते. वर पहाडावर पावसाळ्यात दगडावर शेवाळ जमले असते. तर काही ठिकाणी पावसामुळे मातीत दगडाची पकड घट्ट राहत नाही. अशावेळी अशा दगडांवर बसणे किंवा उभे राहणे खूपच धोक्याचे असते. आतापर्यंत येथे बुडून मरणाऱ्यांमध्ये वरुन पाय घसरुन खाली तलावात पडल्यामुळे व बुडून मृत्यू झाल्यांची संख्या जास्त आहे. तलावात तळात मोठमोठे दगड आहेत त्यामुळे पडणारा कोणीही सरळ दगडावर आपटतो आणि जीव गेल्याशिवाय राहत नाही. स्थानिक लोकं बाहेरच्यांना समजावून सांगूनही कुणी ऐकायला तयार नाही. जर असेच सुरू राहिले तर पुढेही सतत अपघात होत राहणार यात शंका नाही.

Web Title: Suicidal Suspicions of Nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.