लोकसहभागातून बसणार गुन्हेगारीला आळा

By Admin | Updated: December 25, 2014 23:33 IST2014-12-25T23:33:47+5:302014-12-25T23:33:47+5:30

मध्यप्रदेशच्या सीमेलगत व छत्तीसगडपासून जवळच असलेल्या आमगावात परराज्यातील गुन्हेगारांचा शिरकाव होतो. त्यामुळे चोऱ्या, दरोडे, घरफोडी, चैन स्रेचिंग व मुलींची छेडखानी होत असते.

Stop criminal from among people | लोकसहभागातून बसणार गुन्हेगारीला आळा

लोकसहभागातून बसणार गुन्हेगारीला आळा

नरेश रहिले - गोंदिया
मध्यप्रदेशच्या सीमेलगत व छत्तीसगडपासून जवळच असलेल्या आमगावात परराज्यातील गुन्हेगारांचा शिरकाव होतो. त्यामुळे चोऱ्या, दरोडे, घरफोडी, चैन स्रेचिंग व मुलींची छेडखानी होत असते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने आमगावातील नागरिकांनी लोकसहभागातून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा एक भाग म्हणून आमगावातील शहराच्या चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
आमगावातील आंबेडकर चौकातील स्टेशन मार्गावर, गोंदिया मार्गावर, देवरी मार्गावरतसेच आमगाव शहरात जाणाऱ्या मार्गावर प्रत्येकी एक अशे चार कॅमेरे लावण्यात येणार आहेत. मानकर चौकात दोन कॅमेरे, गांधी चौकात चार कॅमेरे लावण्यात येणार आहे. उर्वरित चार कॅमेरे कामठा चौकात लावण्यात येणार आहे.
गांधी चौकातील कॅमेरे बाजार परिसरातून येणाऱ्या रस्त्यावरील, कामठा चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावरील, ग्रामपंचायतकडून येणाऱ्या रस्त्यावरील तसेच मानकर चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावरील चित्रफित कॅमेराबद्ध करणार आहे. कामठा चौकात लावण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे, कामठा मार्गावरील, बालाघाट मार्गावरील, सालेकसा मार्गावरील व आमगावातून कामठा चौकात येणाऱ्यांवर नजर ठेवणार आहे.
बहुतेक वेळा आमगावात दुकान फोडी किंवा जबरी चोरी करण्याच्या घटनांमध्ये परप्रांतातील आरोपींचा समावेश असतो. आमगाव शहरापासून दीड कि.मी. अंतरावर मध्यप्रदेशची सीमा असल्यामुळे आमगावत चोरी करणारे आरोपी मध्यप्रदेशाच्या हद्दीत निघून जात असल्यामुळे पोलिसांना अनेकदा यश मिळत नाही. परंतु या सीसीटीव्ही कॅमेरांमुळे आता प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे. आमगावात घडणारे अपघात, चैन स्रेचिंग, छेडछाड, रस्त्यावर अवैध पार्किंग, चोरी व घरफोडी या घटनांसाठी हे कॅमेरे पोलिसांना मदत करणार आहेत.
आमगाव पोलिसांकडे कमी मनुष्यबळ असल्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यात हे सीसीटीव्ही कॅमेरे मदत करणार आहेत. समाज कंटकांकडून आमगावात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटना व तिन्ही ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. पोलिस निरीक्षक बी.डी. मडावी यांच्या पुढाकाराने आमगावातील रस्त्यांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे व्यापारी, नागरिक व विद्यार्थी यांना लाभ मिळणार आहे. आमगाव येथील सरपंच पदमा चुटे, उपसरपंच निखील पशिने, बनगावचे सरपंच सुषमा भुजाडे, उपसरपंच पृथ्वीपालसिंह सोमवंशी, रिसामाचे सरपंच निर्मला रामटेके, उपसरपंच तिरथ येटरे व नागरिकांच्या पुढाकारामुळे आमगाव पोलीस ठाणे जिल्ह्यात सीसीटीव्ही लावणारे पहिले पोलीस ठाणे ठरणार आहे.

Web Title: Stop criminal from among people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.