भरधाव कार धडकली पुलाच्या खांबावर; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी व दाेन मुल गंभीर जखमी
By अंकुश गुंडावार | Updated: January 22, 2026 18:25 IST2026-01-22T18:25:11+5:302026-01-22T18:25:44+5:30
देवरी-आमगाव मार्गावरील घटना : चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

Speeding car hits bridge pillar; Husband dies on the spot, wife and two children seriously injured
आमगाव : भरधाव कार पुलाच्या खांबावर धडकून पती ठार तर पत्नी, दोन मुले व बहीण असे चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) मध्यरात्रीच्या सुमारास देवरी-आमगाव मार्गावरील डोंगरगाव सोनारटाेला जवळ घडली. अशोक सत्यनारायण मोदी (वय ५५, रा. आमगाव) असे अपघातात ठार झालेल्या पतीचे नाव आहे. तर जखमींमध्ये पत्नी सीमा अशोक मोदी (वय ५०), मुलगा आयुष अशोक मोदी (वय २९), मुलगी मुस्कान अशोक मोदी (वय २५) व बहीण दीपा नितीन अग्रवाल असे अपघातात जखमी झालेल्यांची नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास अशोक मोदी (रा. रीसामा आमगाव) हे आपल्या कारने रायपूरवरून आमगावला कुटुंबासह परत येत होते. कार चालवित असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आमगाव-देवरी मार्गावरील डोंगरगाव जवळील सोनारटोला पुलावरील खांबावर कार धडकली. यात अशोक मोदी, त्यांची पत्नी सीमा मोदी, मुलगा आयुष मोदी, मुलगी मुस्कान मोदी व साळी दीपा अग्रवाल हे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच अशोक मोदी यांचा मृत्यु झाला. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलाच्या विवाहापूर्वीच पित्याचा मृत्यू
अशोक मोदी हे आमगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असून पतंजली आयुर्वेदिक चिकित्सा केंद्राचे संचालक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचे लग्न जुळले होते. लग्न सोहळा महिनाभरावर असताना पित्याचा अपघाती मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंबीय गंभीर जखमी झाल्याने मोदी कुटुंबीयाच्या आनंदावर विरजन पडले.
लग्न सोहळ्याच्या तयारीसाठी गेले होते रायपूर
अशोक मोदी व त्यांचे कुटुंबीय हे मुलाच्या विवाह सोहळ्याची तयारी व खरेदीकरिता रायपूरला गेले होते. तिथून परतत असताना गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अपघात झाला. यात वडील अशोक मोदी यांचा मृत्यू झाला तर पत्नी, मुलगा, मुलगी व त्यांची साळी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.