कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:53 IST2018-09-02T21:52:04+5:302018-09-02T21:53:17+5:30
राज्य परिवहन मंडळाची बस कामठा मार्गावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.१) चांगलाच संताप व्यक्त करीत कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.

कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : राज्य परिवहन मंडळाची बस कामठा मार्गावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.१) चांगलाच संताप व्यक्त करीत कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.
कालीमाटी ते आमगाव दरम्यान शेकडो विद्यार्थी प्रवास करतात. पण सकाळपाळीत तासनतास बस उशिरा येते. तसेच सायंकाळी उशिरा सोडली जाते. सदर प्रकरण अनेक महिन्यांपासून सुरु आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थिनींत चांगलाच रोष खदखदत आहे. यातूनच शनिवारी (दि.१) विद्यार्थिनींनी आपला रोष व्यक्त केला.
आमगाव बस स्थानकातून मानव विकास योजनेंतर्गत २६३, अहिल्याबाई होळकर ३३६ व इतर ७७२ पासधारक दररोज प्रवास करतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि प्रतयेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मानव विकास, अहिल्याबाई होळकर आदी योजनेतून इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थिनींना निशुल्क किंवा अल्पदरात पास तयार करुन दिली जाते. राज्य शासनाच्या राज्य परिवहन विभागाद्वारे विविध योजना चालविल्या जातात. पण प्रशासनाच्या हेकेखोर पणामुळे व दुर्लक्षीत यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासकीय योजना कागदावरच व मंदगतीने धावत असल्याचे दिसून येत आहे.
विलंबाने वाहन सुटत असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. आपल्याकडे तक्रार आली असून या संबंधात आगार प्रमुखांशी बोलणी केली आहे. प्रशासनाने या संबंधी दखल घ्यावी, अन्यथा चक्का जाम आंदोलनाची तयारी आहे.
-सुरेश हर्षे
जिल्हा परिषद सदस्य
..........................
बस स्थानकातून वेळेवर बस सोडण्याचे नेहमी प्रयत्न असते. पण आगारात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एखादा चालक-वाहक सुटीवर असल्यावर तिढा निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता यंत्रणा प्रयत्नशिल आहे.
-एस.एस. कोसरकर
वाहतूक नियंत्रक