मातीसाठी झुरताहेत जिल्ह्यातील मूर्तिकार
By Admin | Updated: July 28, 2014 23:36 IST2014-07-28T23:36:54+5:302014-07-28T23:36:54+5:30
हिंदू धर्माच्या सणासुदीच्या दिवसांना आता सुरूवात झाली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव व दुर्गात्सव आदी सणांत पुजेसाठी देवीदेवतांच्या मातीच्या मूर्त्या घरोघरी नेऊन मोठ्या मनोभावाने त्यांची

मातीसाठी झुरताहेत जिल्ह्यातील मूर्तिकार
खोदकाम बंदी : परवानगीच्या फेऱ्यात व्यवसायावर गदा
गोंदिया : हिंदू धर्माच्या सणासुदीच्या दिवसांना आता सुरूवात झाली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव व दुर्गात्सव आदी सणांत पुजेसाठी देवीदेवतांच्या मातीच्या मूर्त्या घरोघरी नेऊन मोठ्या मनोभावाने त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. याशिवाय सार्वजनिक मंडळांकडूनही मोठ्या प्रमाणात मूर्त्यांची मागणी असते. मात्र ज्या मातीपासून या मुर्त्या तयार करायच्या आहे ती मातीच मिळणे आता दुरापास्त झाले आहे. मातीसाठीही आता शासनाची परवानगी घ्यावी लागत असल्याने मूर्तीकारांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
शिल्पकार, मूर्तिकार, संगीतकार आदी माणसे जगावेगळी असतात. अनेकांसाठी तर आपली कलाच उदरनिर्वाहाचे साधन बनते. मूर्तीकार सुद्धा अशापैकीच एक घटक आहेत. पूर्वी मूर्त्या बनविण्यासाठी त्यांना नदीकाठावरील माती घेण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज पडत नसे. परंतू आता त्यासाठी शासनाने नियम घालून दिले आहेत. त्यामुळे आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मूर्तीकारांना मोठी कसरत करावी लागत असल्याची असल्याचे चित्र आहे.
वाढत्या महागाईने मूर्तीकार कुंभार समाजबांधवांचेही कंबरडे मोडले आहे. काही महिन्यांसाठी चालणाऱ्या या व्यवसायावर त्यांना वर्षभर गुजराण करावी लागते. कठोर परिश्रम घेऊन मूूर्ती साकार झाल्यावर ग्राहकांकडून योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे मूर्तिकारांना आपल्या कलेचा मोहभंग होतो. मूर्त्या तयार करणाऱ्या या कलावंतांच्या माती खोदकामावर शासनाने प्रतिबंध लावला आहे. कागदपत्रे तपासल्यावरच या मूर्तिकारांना शासनाद्वारे माती खोदण्याची परवानगी मिळते. यातून शासनाला कर दिला जातो.
गोंदियाच्या सिव्हील लाईनच्या हनुमान मंदिर परिसरात असलेले मूर्तीकार यांनी सांगितले, सध्या सर्वात मोठी समस्या मातीची आहे. शेतातील माती मूर्त्या तयार करण्याच्या उपयोगात येत नाही. त्यासाठी नाल्यांच्या काठावरील मातीच आवश्यक असते. रजेगाव तसेच पिंडकेपार येथील नाल्यांच्या काठावरून माती आणून आम्ही मूर्त्या तयार करतो. मात्र मातीच्या खोदकामासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागते. एकीकडे व्यवसायासाठी शासन कर्ज देत नाही तर दुसरीकडे मातीच्या खोदकामावर प्रतिबंध लावल्याने आमच्या समाजाच्या उदरनिर्वाहावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)