लॉकडाऊनच्या संकटात धावून आले संकटमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:12+5:30
गोंदिया तालुक्यातील गरजू व्यक्तींची यादी व त्यांच्या मदतीसाठी दोन कर्मचारी सुध्दा दिले. यानंतर समितीच्या सेवा कार्याला २६ मार्चपासून सुरूवात झाली. समितीतर्फे सुरूवातीला गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप सुरू करण्यात आले. जवळपास अडीच हजार गरजूवंताना अन्नधान्य आणि किराणा सामानाचे वाटप केले. गरजूंच्या घरापर्यंत समितीचे सदस्य पोहचून ही मदत पोहचवित आहेत.

लॉकडाऊनच्या संकटात धावून आले संकटमोचन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्या आणि गोरगरीबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने घरची चूल पेटणार कशी अशा विंवचनेत अनेक कुटुंब आहे. मात्र संकटात मदतीला धावून जाणे ही आपली संस्कृती असल्याने कुणावरही उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहे. हनुमानाला संकट मोचन म्हटले जाते. त्यामुळे लॉकडाऊनच्या संकटात येथील सिव्हिल लाईन हनुमान मंदिर सेवा समिती मदतीला धावून आल्याचे चित्र आहे.
सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिर सेवा समिती दरवर्षी हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. हजारो लोकांना यानिमित्त अन्नदान केले जाते. शिवाय दूरदूरवर या मंदिराची ख्याती असल्याने अनेक भाविक या मंदिराला वस्तू व पैशाच्या स्वरुपात दान देतात. मात्र यंदा सर्वच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासन आणि प्रशासनाने गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे. याच आदेशाचे पालन करीत हनुमान मंदिर सेवा समितीने हनुमान जयंती साजरी न करता आल्याने लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यांची ही विनंती उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी मान्य केली.
गोंदिया तालुक्यातील गरजू व्यक्तींची यादी व त्यांच्या मदतीसाठी दोन कर्मचारी सुध्दा दिले. यानंतर समितीच्या सेवा कार्याला २६ मार्चपासून सुरूवात झाली. समितीतर्फे सुरूवातीला गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप सुरू करण्यात आले.
जवळपास अडीच हजार गरजूवंताना अन्नधान्य आणि किराणा सामानाचे वाटप केले. गरजूंच्या घरापर्यंत समितीचे सदस्य पोहचून ही मदत पोहचवित आहेत. तर शासनाने लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ झाल्याने अनेक गरजूंनी त्यांच्याकडे जेवणाची सोय करण्याची मागणी केली.उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुध्दा समितीला आश्रयास असलेल्यांना जेवण पुरविण्याची विनंती केली.
त्यामुळे समितीने १५ एप्रिलपासून गरजूंना दोन वेळेचे तयार केलेले जेवण पोहचविण्यास सुरूवात केली. सध्या समितीच्या माध्यमातून दररोज अडीच हजार गरजूंना दोन वेळेचे तयार जेवण पोहचविले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात हनुमान मंदिर सेवा समितीच्या सेवा कार्याची गरजूंना मदत होत आहे.
१४० सदस्यांची सेवा
सिव्हील लाईन हनुमान मंदिर सेवा समितीचे एकूण १४० सदस्य असून हे सर्व या सेवा कार्यात मागील महिनाभरपासून व्यस्त आहे.याशिवाय ४७ स्वंयसेवक स्वत:हून गरजूंना दोन वेळेच्या जेवणाचे डब्बे आणि अन्नधान्य पोहचविण्याचे काम करीत आहे. सकाळी सहा वाजतापासून या कार्याला सुरूवात होते.त्यानंतर १० वाजपासून सर्व गाड्या तयार केलेल्या जेवणाचे पॅक डब्बे घेवून वाटप करण्यासाठी विविध ठिकाणी रवाना होतात. त्यांच्या मदतीला गावातील सरपंच,पोलीस पाटील, कोतवाल यांची मदत घेतली जात आहे.
सर्वधर्म समभावचा संदेश
हनुमान मंदिर सेवा समितीत सर्व समाजबांधवाचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुस्लीम समाजबांधव सुध्दा या सेवा कार्यात सक्रीयपणे सहभागी आहे. देखील सकाळपासूनच जेवणाचे डब्बे तयार करण्यापासून ते गरजूपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करीत आहेत. समितीच्या या कार्यातून सर्वधर्म समभावचा संदेश दिला जात आहे.
समितीकडे मदतीचा ओघ सुरूच
सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिराची जागृत हनुमान मंदिर अशी सर्वदूर ख्याती आहे. त्यामुळे भाविक या ठिकाणी मुक्त हस्ताने दान करतात. समितीतर्फे सध्या लॉकडाऊनमधील गरजूंना मदत केली जात असल्याने अनेक भाविक अन्नधान्य आणि पैशाची मदत करित आहेत. तर समितीकडे मदतीचा ओघ वाढत आहे.
आमचे नाव नको समितीच्या नावातच सर्व काही
मागील जवळपास पंधरा ते वीस दिवसांपासून हनुमान मंदिर समितीचे सेवा कार्य सुरू आहे. यासाठी समितीचे सर्व सदस्य अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे सेवा कार्य करणाऱ्यांची नावे विचारली असताना हनुमान मंदिर समितीच्या नावातच सर्व काही आल्याचे सांगत सेवा कार्यासाठी नाव नको तर काम होणे महत्त्वाचे असल्याचे सदस्यांनी सांगितले.
या गावात पोहचली मदत
हनुमान मंदिर सेवा समितीतर्फे अन्नधान्याची मदत आणि दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. यातंर्गत तालुक्यातील गोंडीटोला, कटंगी, गंगाझरी, मज्जीपूर, दासगाव, सहेसपूर, एकोडी, धामनेवाडा, दवनीवाडा, जुनेवानी, खातीटोला, धापेवाडा, मुरदाडा, वळद या गावांपर्यंत पोहचून मदत केली जात आहे.