सालेकसा नगरपंचायत कार्यालयाला लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST2022-04-27T05:00:00+5:302022-04-27T05:00:06+5:30
सालेकसातील काही अज्ञात समाजकंटकांनी ही आग लावल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी नवे-जुने रेकॉर्ड असलेले दस्तावेज ठेवले होते त्या दस्तावेज रेकार्ड रूममध्ये खिडकीतून आग लावण्याचे काम केले. आगीचा भडका उडाला असता नगरपंचायत कार्यालयाच्या मागे वास्तव्यास असलेल्या काही लोकांना कार्यालयाच्या आत आग लागली असल्याचे समजले. त्यांनी लगेच नगरपंचायतीच्या स्थानिक कर्मचाऱ्याला फोन लावून याची माहिती दिली.

सालेकसा नगरपंचायत कार्यालयाला लावली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : येथील नगरपंचायत कार्यालयाला गावातील काही अज्ञात समाजकंटकांनी पहाटे आग लावल्यामुळे नगरपंचायत कार्यालयातील अनेक महत्त्वाचे दस्तावेज तसेच जवळपास अडीचशे फायली जळून राख झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. २६) पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, सालेकसातील काही अज्ञात समाजकंटकांनी ही आग लावल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी नवे-जुने रेकॉर्ड असलेले दस्तावेज ठेवले होते त्या दस्तावेज रेकार्ड रूममध्ये खिडकीतून आग लावण्याचे काम केले. आगीचा भडका उडाला असता नगरपंचायत कार्यालयाच्या मागे वास्तव्यास असलेल्या काही लोकांना कार्यालयाच्या आत आग लागली असल्याचे समजले. त्यांनी लगेच नगरपंचायतीच्या स्थानिक कर्मचाऱ्याला फोन लावून याची माहिती दिली.
त्या कर्मचाऱ्याने नगरपंचायत येथे येऊन दस्तावेज जळताना पाहिले. त्यांनी नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अजय वाघमारे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून आपल्या सहकार्यासह आग विझविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आग विझविल्यामुळे कार्यालयातील बराच मोठा दस्तावेज व फायली आगीत राख होण्यापासून वाचविण्यात त्यांना यश आले.
मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत नगरपंचायत कार्यालयातील जवळपास २५० फायली व इतर महत्त्वाचे दस्तावेज जळून राख झाले होते.
जुने रेकॉर्ड जळाले
या आगीत नगर पंचायतीच्या आधीचे ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड असलेल्या फायली जळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना जुन्या रेकॉर्डची माहिती प्राप्त करणे कठीण होणार आहे. सकाळी ७.०० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आले. जळत असलेल्या फायली इमारतीच्या बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
सालेकसा पोलीस स्टेशनला तक्रार
सालेकसा नगरपंचायत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहत आली आहे. येथील लोक नगरपंचायतीमध्ये आपल्या समस्या घेऊन येत असतात. अशात नगरपंचायत कार्यालयाला आग कोणी लावली हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून घटनेची तक्रार पोलीस स्टेशन सालेकसा येथे करण्यात आली. पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.