ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाऱ्यावर
By Admin | Updated: October 11, 2014 01:53 IST2014-10-11T01:53:45+5:302014-10-11T01:53:45+5:30
यंदा सालेकसा तालुक्यात सर्वत्र डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले असून शेकडो लोक डेंग्यू व मलेरियाच्या जबड्यात सापडले. त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाऱ्यावर
सालेकसा : यंदा सालेकसा तालुक्यात सर्वत्र डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले असून शेकडो लोक डेंग्यू व मलेरियाच्या जबड्यात सापडले. त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले. तर वेळेवर दक्षता घेतल्याने अनेकांचा जीव वाचला. एवढे असून सुद्धा व जवळपास दोन महिन्यांपासून तालुक्यात साथरोग पसरण्याची भीती असून आजही तालुक्यातील अनेक गावांत आरोग्य सेवा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
डेंग्यू व मलेरियाचे मच्छर सर्वत्र कायम असूनसुद्धा अनेक गावे अशी आहेत की, त्या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी पोहोचत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी करताना कोणी दिसत नाही अशी खळबळजनक बाब पुढे येत आहे. साथ रोगाची लागण झाल्यानंतर दोन चार दिवस आरोग्य कर्मचारी गावात फिरतात. मात्र त्यानंतर पुन्हा कायमचे बेपत्ता झालेले असतात. यंदा बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोटरा, सिंधीटोला, जोशीटोला या गावांना तर पूर्णपणे डेंग्यू व मलेरियाने आपल्या जबड्यात घेतले होते. यात सिंधी टोला येथे एक महिलेचा मृत्यूसुद्धा झाला तर काही इतर गावांत झालेल्या मृत्यूची नोंद साथरोगांमुळे झाल्याची करण्यात आली नाही.
या सर्व प्रकरणांमागे एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, गावागावांत नेमण्यात आलेले आरोग्य सेवक नेहमी बेपत्ता राहणे, प्रत्येक घरांना भेटी न देणे. या बाबत संबंधित पर्यवेक्षकांचे त्यांच्यावर नियंत्रण नसणे तसेच आरोग्य सेवक, सेविका, पर्यवेक्षक, आरोग्य सहायक व वैद्यकिय अधिकाऱ्यांपर्यंत सर्व आरोग्य कर्मचारी समन्वय न ठेवता कोणीच मुख्यालयी राहत नाही. एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम करुन स्वत: कामचुकारपणा करण्याचे प्रकरण जास्त घडत आहेत. तिरखेडी उपकेंद्राचे आरोग्य सेवक दोन वर्षापासून बेपत्ता असूनही त्यांच्या ऐवजी कोणी दुसरा आरोग्य सेवक विभागाने नियुक्त केला नाही. एकिकडे त्या आरोग्य सेवकांची जागा भरलेली दाखविण्यात येते.
सालेकसा तालुका हा अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात मोडणारा तालुका आहे. या तालुक्यात गरीब आदिवासी व मागासलेले लोक जास्त प्रमाणात असून ते आरोग्याच्या बाबतीत फारशे सजग नसतात. अशा वेळी त्यांचे आरोग्य सरकारी यंत्रणेच्या भरवशावर जास्त अवलंबून असते. शासकीय आरोग्य सेवा वेळेवर योग्य प्रमाणात मिळत नसेल तर निश्चितच लोकांचे आरोग्य संकटात राहिल. यासाठी आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकात समन्वय असून गरीब आदिवासी लोकांना आरोग्य सेवा देणे कर्मचारी व अधिकारी यांचे प्रथम कर्तव्य बनते.
परंतु परिस्थिती अगदी विपरीत दिसून येत आहे. एकीकडे कोणताही आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तर दुसरीकडे सर्व लोक घरभाडा व इतर भत्ते घेऊन शासनाची दिशाभूल करीत आहेत.
परिणाम सर्वसामान्य गरीब जनतेला भोगावे लागत आहेत. परसिरात योग्य व वेळेवर आरोग्य सेवा मिळावी म्हणून जि.प. सदस्य कल्यणी कटरे यांनी आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सहायकांंना समज देण्याचे प्रयत्न केले. परंतु याचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्याच प्रमाणे बिजेपार प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत मरकाखांदा येथील सरपंच किरण रामप्रसाद उपराडे यांनीसुद्धा कर्मचारी व पर्यवेक्षक आपल्या गावात लक्ष देत नसल्याची तक्रार केली. परंतु तालुका स्तरावर त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे काम चुकार आरोग्य कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करुन गावातील आरोग्य सेवा सुरळीत ठेवावी, अशी मागणी उपराडे यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. (तालुका प्र्रतिनिधी)